जगाच्या कल्याणात विज्ञानाची मोलाची भूमिका – डॉ. देशमुख

0
52

 

उमरगा, :-  श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात विज्ञान मंडळाच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. ए. एम. देशमुख, अध्यक्ष, मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. अस्वले होते.उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. देशमुख यांनी विज्ञानाच्या महत्त्वपूर्ण पैलूंवर सखोल चर्चा केली. समाजाच्या विकासात आणि आरोग्य सुधारण्यात विज्ञानाचे योगदान मोठे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच संशोधन आणि नवसंशोधन यांच्यावर प्रकाश टाकत, विविध आजारांवरील लसीकरणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.विद्यार्थ्यांनी विज्ञानाचा सखोल अभ्यास करून आपले करिअर घडवावे, कारण विज्ञानामुळे व्यक्तीला प्रतिष्ठा मिळते आणि जागतिक स्तरावर विविध संधी उपलब्ध होतात, असे त्यांनी प्रतिपादन केले. फक्त नोकरीच्या संधींची वाट पाहण्याऐवजी विद्यार्थ्यांनी स्वतःला त्या संधींसाठी योग्य बनवणे आवश्यक आहे. त्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यास आणि कठोर परिश्रम महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती आणि विविध योजनांचा अभ्यास करून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करत त्यांनी विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना समाजोपयोगी कार्य करण्याचे आवाहन केले. विशेषतः शेतकऱ्यांना जैविक शेती व सेंद्रिय खतांविषयी मार्गदर्शन करणे हीदेखील एक प्रकारची देशसेवा असल्याचे त्यांनी नमूद केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी न्यूनगंड झटकून मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती साकार करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी, असा सल्ला त्यांनी दिला.मार्गदर्शनानंतर प्रा. डॉ. देशमुख यांनी विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांच्या प्रश्नांना सविस्तर उत्तरे दिली. चर्चेत कोरोना: वास्तव व अफवा, प्रोबायोटिकचे आहारातील महत्त्व, लसीकरणाचे महत्त्व यांसारख्या ज्वलंत विषयांचा समावेश होता. अध्यक्षीय समारोपात डॉ. अस्वले यांनी विज्ञानाच्या संशोधनाचा फायदा समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. तसेच, विद्यार्थ्यांनी विज्ञान शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःला रोजगारक्षम बनवावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्राचार्य डॉ. एस. एन. अस्वले, उपप्राचार्य डॉ. विलास इंगळे, उपप्राचार्य डॉ. पद्माकर पिटले, विज्ञान मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. व्ही. एम. गायकवाड, तसेच विज्ञान विभागाचे प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. डॉ. व्ही. एम. गायकवाड यांनी केले, तर सूत्रसंचालन कु. प्रतीक्षा बेंडगे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय कु. रेणुका वाकळे यांनी करून दिला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनानंतर प्रा. डॉ. निर्मळे एम. एस. यांनी आभार प्रदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here