लोहारा :- 2016 साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने लातूर येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय स्थापन करण्यास मंजुरी दिली, निधी उपलब्ध करून देऊन इमारतीचे बांधकामही पूर्ण झाले आहे. सदरील लातूर अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु व्हावे यासाठी आ.अभिमन्यु पवार यांनी 2023 पासून पाठपुरावा करीत होते. 2024 च्या पावसाळी अधिवेशनात 5 जुलै, 2024 रोजी हा मुद्दा आ. अभिमन्यु पवार यांनी औचित्याद्वारे सभागृहातही उपस्थित केला होता. आ. पवार यांच्या विनंतीवरून लातूर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दि.11 फेब्रुवारी रोजी मुंबई येथे उच्चस्तरीय बैठक पार पडली. सविस्तर चर्चेअंती मा दादांनी जून 2025 पासून लातूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करण्याचे स्पष्ट निर्देश उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले असून तसा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यास सांगितले आहे. लातूर येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नसल्याने अभियांत्रिकी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयातून महागडे शिक्षण घ्यावे लागते. लातूर अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु झाल्यानंतर लातूरसह धाराशिव, नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे या निर्णयासाठी तमाम लातूरकरांच्या वतीने आ.अभिमन्यु पवार यांनी आभार मानले आहे. या बैठकीला माजी मंत्री तथा उदगीरचे आमदार संजयजी बनसोडे, यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.