लोहारा :- शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्वावर कार्यरत असलेल्या अभ्यागत अधिव्याख्यातांना सेवेत सामावून घेणे तसेच त्यांना नियमित व पूर्णवेळ सेवेचे अन्य लाभ देणे या मागण्यांसाठी आ. अभिमन्यु पवार यांच्या विनंतीवरून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक संपन्न झाली. सर्वप्रथम न्यायालयीन प्रकरण मार्गी लावण्यासाठी चांगले वकील नियुक्त करून सकारात्मक भूमिका मांडण्याच्या सूचना मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ग्रंथालय संघांच्या मागण्यांसंदर्भातही स्वतंत्र बैठक संपन्न झाली. ग्रंथालयांच्या अनुदानात 40% वाढ करण्याची, ग्रंथालयांची दर्जोन्नती करण्याची आणि नवीन ग्रंथालयांना मंजुरी देण्याची घोषणा सरकारने यापूर्वी केली असून त्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी अशी विनंती आ. अभिमन्यु पवार यांनी यावेळी केली. अनुदान वाढीचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करण्याच्या तसेच बंद पडलेल्या ग्रंथालयांना पुनर्जीवित करण्याच्या व नव्या ग्रंथालयांना मान्यता देण्याच्या सूचना यावेळी मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्या असून ग्रंथालय दर्जोन्नतीसाठी लागणाऱ्या सुमारे 20 कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद करवून घेण्याचा शब्दही यांनी यावेळी दिला असल्याची माहिती आ.अभिमन्यु पवार यांनी दिली.