मुळज तांडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्यावतीने  सांस्कृतिक कला महोत्सव संपन्न 

0
18

उमरगा – तालुक्यातील मुळज लमाण तांडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कला महोत्सवास रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बंजारा तांड्यावरील या विद्यार्थी कलावंतांनी लावणी , पोवाडा , लोकगीते , गवळण, भारूड , शेतकरी गीते , भक्तीगीते , देशभक्तीपर या विविध कला प्रकारांचे बहारदार सादरीकरण करून रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. विद्यार्थी कलावंतानी सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांच्या अप्रतिम सादरीकरणातून मुळज लमाण तांड्यावर देशभक्तीचे दर्शन घडून आले.

तालुक्यातील मुळज जिल्हा परिषद प्राथमिक शैक्षणिक गुणवत्ते बरोबरच सामाजिक , शैक्षणिक , सांस्कृतिक , कला , क्रिडा या विविध क्षेत्रात अग्रेसर आहे. या शाळेचे मुख्याध्यापक बळीराजा घोरवाडे यांना राज्य शासनाच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले आहे. या जिल्हा परिषद शाळेत शिकणारे बहुतांश विद्यार्थी हे शेतकरी व शेतमजुरांचे आहेत. या शाळेच्या ग्रामस्थांच्या पुढाकारातून या शाळेने माळरान जमिनीवर विविध वृक्ष लागवड करून आपल्या शाळा परिसराला निसर्ग सौंदर्य प्राप्त करून दिले आहे. तांड्यावरील विद्यार्थी कलावंतांच्या विविध कला गुणाना प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक वर्षाला ग्रामस्थांच्या पुढाकारातून विद्यार्थी कलावंतांसाठी सांस्कृतिक कला महोत्सव घेण्यात येतो.

सोमवारी सायंकाळी शाळेच्या प्रांगणात सांस्कृतिक कला महोत्सव घेण्यात आला. सरपंच महेश शिंदे, माजी सरपंच आप्पासाहेब वडदरे, कविता राठोड , विस्तारअधिकारी काकासाहेब साळुंके,केंद्रप्रमुख भरत चौधरी, देविदास मुळजे, दत्तात्रय पाटील , शाम मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी श्री गणेशा देवा या गणेश वंदनेने कला महोत्सवाची सुरुवात झाली. सप्तरंगी विद्युत रोषणाईच्या झगमगाटात एका पेक्षा आशा सदाबहार गाण्यांचे सादरीकरण करून विद्यार्थी कलावंतांनी उपस्थित रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. आला रे आला सिंबा आला. गाडी घुंगराची – थोरल्या भायाची , मला लागली कुणाची उचकी, झूंजू – मुंजू पहाट झाली. ओ शेठ तुम्ही नादच केला थेट , आंबाबाई गौधळाला ये , आपलीच हवा, पुष्पा, पिचली माझी बांगडी , दर्या किनारे एक बंगलो , श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा , लुंगी डान्स या सह आदि गीत व नृत्यांच्या सादरीकरणातून विद्यार्थी कलावंतांनी रसिक प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले. विद्यार्थी कलावंतानी सादर केलेल्या विविध देशभक्तीपर गीतांच्या सादरीकरणाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तांड्यावरील कलावंतांनी अप्रतिम देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करून तांड्यावर देव आणि देशभक्तीचे दर्शन घडवून आणले.

शालेय समितीचे अध्यक्ष भास्कर राठोड, उपाध्यक्ष मिथुन चव्हाण , शिवराम जाधव , अमोल चव्हाण, सतीश राठोड , प्रकाश जाधव, मोहन राठोड, सुनील राठोड, प्रदीप चव्हाण , विकास पवार, प्रवीण जाधव , सह मुळज लमाणतांडा ग्रामस्थांनी कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी विशेष परिश्रम घेतले. या वेळी नाते मैत्रीचे ग्रुपचे प्रा. सुर्यकांत वाघमारे , रणजित कोराळे, जगदिश जाधव , भास्कर कवडे सह आदिंची उपस्थिती होती. प्रास्ताविक बळीराजा घोरवाडे यांनी केले. सुत्रसंचालन आनंद मोरे व धनराज कुडकले यांनी केले. ग्रामस्थ महिला पालक व परिसातील कला प्रेमींची मोठ्या संख्येनी उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here