लोहारा :- विधी सेवा समितीच्या वतीने दिल्या जाणाऱ्या मोफत कायदेविषयक मदतीचा लाभ घ्यावा, असे आवाहान उमरगा तालुका विधी सेवा चिकित्सालय कक्षाचे विधीज्ञ सल्लागार ॲड.फरहीन खान पटेल यांनी केले. महिला आर्थिक विकास महामंडळ, [माविम] धाराशिव द्वारा संचलित संज्योत लोकसंचलित साधन केंद्र, दाळिंब कार्यालयांतर्गत नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प जेंडर इंटीग्रेशन ॲन्ड न्यूट्रिशन या घटका अंतर्गत उमरगा तालुक्यातील दाळींब येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात दि.24 फेब्रुवारी 2025 रोजी कायदेविषयक प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी बोलत होत्या. प्रारंभी ॲड. फरहीन खान-पटल, बेगमबी मुल्ला (अध्यक्ष संज्योत CMRC, डाळींब) व मंगल शेवाळे (सचिव संज्योत CMRC, डाळिंब)यांच्या हस्ते क्रांती ज्योती साविञीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी ॲड.फरहीन खान-पटेल पुढे बोलताना म्हणाल्या कि, दर रविवारी ग्रामपंचायत कार्यालय दाबका येथे सकाळी 9 ते 1 पर्यंत कायदेविषयक माहिती देण्यात येणार आहे. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे सांगुन महिलांवर होणारी कौटुंबिक हिंसा, महिलांचा मालमत्तेवरील हक्क व अधिकार, बाल लैंगिक शोषण, विविध कायदे,पोटगी दावा या बाबतीत कायदेविषयक सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. निर्मला शिंदे यांनी केले तर आभार सौ.दिक्षा बनसोडे यांनी महिला. या कार्यक्रमास महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.