उमरगाः शहरातील श्रमजीवी शिक्षण संस्थेच्या प्रांगणात दि. ४ मार्च रोजी सर्व रोग तपासणी,उपचार, निदान शिबीर तर दि.५ मार्च रोजी महारक्तदान शिबीर याप्रमाणे दोन दिवसीय महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती दि.1 मार्च रोजी दुपारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत भाजपाचे युवा नेते तथा उमरगा जनता सहाकारी बँकेचे अध्यक्ष शरण बसवराज पाटील यांनी दिली आहे.
या शिबिरात कॅन्सर, हृदयरोग, मधुमेह, स्त्रीरोग, बालरोग, नेत्र, कान, नाक, घसा आदीसह सर्वच रोगांची मोफत तपासणी, औषधोपचार व आवश्यकतेनुसार मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. तसेच महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.शिबिरात दिव्यांग, वयोवृद्ध व्यक्तींना आवश्यक असलेल्या साहित्याचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. महाआरोग्य सहभागी लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत कार्ड काढून देण्यात येणार आहे. उमरगा – लोहारा तालुका परिसरातील तसेच धाराशिव, लातूर, सोलापूर येथील गरजूनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन उमरगा जनता बँकेचे चेअरमन तथा भाजपाचे युवा नेते शरण बसवराज पाटील यांनी केले आहे.
या शिबिराचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री भगवंत खुबा यांच्या हस्ते होणार असून, यावेळी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, माजी आ. ज्ञानराज चौगुले, जिल्हा बँकेचे चेअरमन बापुराव पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांची उपस्थिती राहणार आहे. महाआरोग्य शिबिराच्या ठिकाणी दोन दिवस रुग्ण, त्यांचे नातेवाईक आदीसह सर्व उपस्थितांना चहा, नाष्टा व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. मराठवाड्यातील जास्तीत जास्त गरजुंनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन उमरगा जनता बँकेचे चेअरमन तथा भाजपाचे युवा नेते शरण पाटील यांनी केले आहे. पत्रकार परिषदेला जि.प.माजी सदस्य रफीक तांबोळी, माजी सभापती सचिन पाटील, योगेश राठोड, दगडू पाटील, प्राचार्य डॉ. श्रीराम पेठकर, डॉ. शौकत पटेल, महेश माशाळकर, राजु मुल्ला आदी मान्यवर उपस्थित होते.