औसा :- मस्साजोगचे दिवंगत सरपंच स्व.संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृणपणे आणि अमानवीयपणे हत्या करण्यात आलेली. गेलेला माणूस आपण परत आणू शकत नाही पण किमान त्यांच्या कुटुंबियांना मायेचा आधार द्यावा अशी आ. अभिमन्यु पवार व यांच्या अनेक सहकाऱ्यांची भावना होती. देशमुख कुटुंबियांना मदत करण्याच्या आ. अभिमन्यु पवार यांच्या भावनेला औसा मतदारसंघातील नागरिकांचे भक्कम पाठबळ लाभले. आ. अभिमन्यु पवार यांनी अनेक सहकाऱ्यांसह देशमुख कुटुंबीयांची भेट घेऊन औसा मतदारसंघातील नागरिकांनी जमा केलेला 21 लक्ष रुपयांचा मदत निधी त्यांना सुपूर्द केला. आमच्यासाठी हा विषय जातीचा नाही, पक्षाचा नाही आणि राजकारणाचाही नाही, हा विषय माणुसकीचा आहे आणि तेच माणुसकीचे नाते दृढ करण्यासाठी आम्ही औसेकरांनी देशमुख कुटुंबासाठी मदत निधी जमा केला, अशी भावना आ. अभिमन्यु पवार यांनी व्यक्त केली.