धाराशिव :- तालुक्यातील घुगी येथील हिंदू-मुस्लिम बांधवानी (दि.३१) एकत्र येत व जातीय सलोखा राखत रमजान ईद व अखंड हरिनाम सप्ताहाचा पहिला दिवस आनंदात साजरा केला. धाराशिव तालुक्यातील घुगी हे एक छोटेशे गाव, त्यांनी आज देशातील सर्व नागरिकांना एक मोठा संदेश दिला आहे. सध्या देशात सुरू असलेले जाती जाती मधील तेढ व हिंदू- मुस्लिम या दोन धर्मातील वाढत असलेला द्वेष पाहता घुगी या गावाने एक आदर्श उपक्रम साजरा केला आहे. घुगी येथे योगायोगाने रमजान ईद व अखंड हरिराम सप्ताहाचा पहिला दिवस एकत्र आला. याच संधीचा येथील हिंदू मुस्लिम बांधवानी सोनं केलं आहे. सप्ताह मध्ये दिली जाणारे पहिल्या अन्न दानाचा मान येथील मुस्लिम बांधवानी घेतला व गावातील सर्व हिंदू बांधवाना गुलगुले, शुरखुंबा, भज्जे, या शाही भोजनाची मेजवानी दिली. त्यामुळे पंचक्रोशीत येथील हिंदू मुस्लिम बांधवांचा एकोपा दिसून आला. रमजान ईद व अखंड हरिराम सप्ताहाचा पहिला दिवस हिंदू मुस्लिम बांधवानी एकत्र साजरा केल्याने घुगी गावचे व येथील आयोजकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.