लोहारा :-लातूर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु व्हावे यासाठी 2023 पासून आ.अभिमन्यु पवार पाठपुरावा करीत होते. या पाठपुराव्याला यश आले असून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत लातूर शासकीय शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय 2025 पासून सुरु करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. 5 जुलै, 2024 रोजी लातूर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विषय आ. अभिमन्यु पवार यांनी सभागृहात मांडला होता. त्यानंतर आ.अभिमन्यु पवार यांच्या विनंतीवरून लातूर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दि.11 फेब्रुवारी, 2025 रोजी मुंबई येथे उच्चस्तरीय बैठक पार पडली होती. या बैठकीत मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी लातूर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. सदरील प्रस्ताव अर्थ मंत्रालयात प्रलंबित असल्याचे निदर्शनास आल्यानंतर दि.11 मार्च रोजी आ.अभिमन्यु पवार यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांची विधिमंडळ प्रांगणात भेट घेऊन त्यांनाही हा विषय प्राधान्याने मार्गी लावण्याची विनंती केली होती. त्यानंतर दि.18 मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन मंत्रिमंडळ मंजुरीसाठी पाठपुरावा केला होता. लातूर हे शैक्षणिक हब म्हणून ओळखले जाते पण लातूर येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नसल्याने अभियांत्रिकी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयातून महागडे शिक्षण घ्यावे लागते. लातूर अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु झाल्यानंतर लातूरसह धाराशिव, नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील व पालकमंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज यांचे आ.अभिमन्यु पवार यांनी मनःपूर्वक आभार मानले आहे.