लोहारा :- येथील युनियन बँक ऑफ इंडिया शाखेच्या वतीने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान (उमेद) अंतर्गत कार्यरत गटांना अग्री राईज आऊट रिच कॅम्प योजने अंतर्गत बचत गट कर्ज मेळाव्याच्या अनुषंगाने आरणी (ता. लोहारा) येथील एकूण ७ महिला बचत गटांना २६ लाख रुपये कर्ज मंजूर करून गुरुवारी (दि.८) कर्ज वाटप करण्यात आले आहे. युनियन बँकेचे क्षेत्रीय कार्यालय अहमदनगर क्षेत्रप्रमुख सुनील यादव, उपक्षेत्र प्रमुख सुभाष गजभिये, उपक्षेत्र प्रमुख अमितकुमार सिंग, यांच्या मार्गदर्शनाखाली लोहारा युनियन बँकेचे शाखा व्यवस्थापक संदीप पुरी, डेप्युटी ब्रांच मॅनेजर मुकेश जाधव, विशेष सहाय्यक विकास जाधव, सहाय्यक विशाल बिराजदार, कॅशियर दामोदर सूर्यवंशी, प्रभाग समन्वयक सौरभ जगताप, प्रभाग संघ व्यवस्थापक मंगलताई गायकवाड, सीआरपी भारतबाई मस्के यांच्या उपस्थितीत लोहारा तालुक्यातील आरणी येथील स्वामी समर्थ, महालक्ष्मी, संत सखुबाई, किरण महिला बचत गट या बचत गटांना कर्ज मंजूर करून त्याचे बचत गटाच्या महिलांना २६ लाख रुपयांच्या चेकचे वितरण करण्यात आले. महिलांनी युनियन बँकेकडून घेतलेल्या कर्जाच्या माध्यमातून आपल्या उपजीविका व व्यवसाय उभारून महिला सक्षमीकरणासाठी व व्यवसाय उभारणीसाठी सदरील पैशाचा वापर करून स्वत:सह आपल्या कुटुंबियांच्या उत्पन्नात वाढ करुन सक्षम बनावे असे शाखा व्यवस्थापक संदीप पुरी यांनी महिलांना मार्गदर्शन म्हणाले. उमेद अंतर्गत कानेगाव प्रभागातील एकूण ९६ महिला बचत गटांना ६० लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज उपलब्ध करून दिले आहे. सदरील गट युनियन बँकेला जोडले असून महिला बचत गटातील सदस्यांना व्यवसायासाठी बँकेमार्फत कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. त्यामुळे आता महिलांना योग्य तो व्यवसाय करण्यासाठी सन्मानाने आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत होणार असून बँकेने मुबलक प्रमाणात कर्ज उपलब्ध करून दिल्यामुळे आता महिलांना खाजगी सावकाराचे उंबरठे झिजवण्याची गरज नसल्याचे यावेळी कर्ज मिळालेल्या महिलांनी सांगितले. यावेळी युनियन बँकेचे कर्मचारी बसय्या स्वामी, सचिन फताटे, युनियन बँकेचे ग्राहक सेवा केंद्र चालक अशोक दुबे यांच्यासह महिला बचत गटाच्या सदस्या, व ग्राहक उपस्थित होते.