वीजपुरवठ्यातील समस्या दूर करा; अन्यथा रुमणे घेऊन मोर्चा काढू! –  ऍड. शीतल चव्हाण फाउंडेशनचा इशारा

0
171

उमरगा:-  शहर व परिसराला गेल्या अनेक वर्षांपासून वीजपुरवठ्याची समस्या भेडसावत आहे. सतत वीजपुरवठा खंडीत होणे, तासंतास विद्युतवीज नसणे, शेतकऱ्यांचे डी पी सतत जळणे अशा अनेक समस्यांनी मागच्या अनेक वर्षांपासून या भागातील शेतकरी व नागरिक त्रस्त आहेत. ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यात यावी यासाठी ऍड. शीतल चव्हाण फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, एम.एस.ई. बी चे स्थानिक कार्यकारी अभियंता, मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस, धाराशिवचे पालक मंत्री मा. प्रतापराव सरनाईक, धाराशिव मतदारसंघाचे खासदार मा. ओमराजे नींबाळकर, उमरगा-लोहरा मतदारसंघाचे आमदार मा. प्रवीण स्वामी यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हंटले आहे की, “जग चंद्रावर, मंगळावर गेले पण उमरगा भागातील लोकांना अद्यापही मूलभूत सुविधांसाठी झगडावे लागत आहे. या गंभीर समस्येवर यापूर्वीही अनेकवेळा लिहून, बोलून, सांगून व निवेदने देऊन झाले आहे. पण तरीही परिस्थितीत सुधारणा होताना दिसत नाही. सध्या कडाक्याचा उन्हाळा व मध्येच अवकाळी पाऊस असे समिश्र वातावरण आहे. त्यात सतत वीजपुरवठा खंडीत होत असल्याने नागरिकांना उकाडा, डास व चिलटाचा त्रास, विद्युतवीज नसल्याने रात्री अंधारात जागून काढणे आणि त्यामूळे आरोग्यावर गंभीर परिणाम होणे अशा समस्या भेडसावत आहेत. शेतकरी व व्यापाऱ्यांची अनेक कामे वीजपुरवठ्याअभावी खोळंबली जात आहेत आणी त्यातून प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत या भागातील अनेक वर्षांच्या वीजपुरवठ्याच्या समस्येवर कायमच्या उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे. आपण यात तातडीने लक्ष घालून उपाययोजना आखाव्यात अन्यथा संतप्त जनतेच्या रोषाला आणी त्यातून होणाऱ्या सर्व परिणामाला आपणास समोरे जावे लागेल याची गांभीर्यपूर्वक नोंद घ्यावी.”दरम्यान सामाजिक कार्यकर्ते ऍड. शीतल चव्हाण यांनी समाज माध्यमांवर उमरगा परिसरातील समस्येबाबत पालकमंत्री, खासदार, आमदार व ‘एमएसईबी’ ने तात्काळ लक्ष घालावे अन्यथा रुमणे घेऊन मोर्चा काढू असा इशारा दिला आहे.निवेदनावर सत्यनारायण जाधव, राजू भालेराव, राजू बटगिरे, ऍड. ख्वाजा शेख, ऍड. अर्चना जाधव, एस. के. चेले, ज्योती माने, बबिता मदने, शबाना उडचणे, किशोर बसगुंडे, धानय्या स्वामी, करीम शेख आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here