लोहारा शहराला वादळी वारे व अवकाळी पावसाने झोडपले, अनेकांच्या घरात शिरले पाणी, घरावरील पत्रे उडाले, झाडे उन्मळून पडली, कास्ती येथे अंगावर झाड पडून १ म्हैस जागीच ठार

0
307

 

इकबाल मुल्ला

लोहारा:-  शहराला तब्बल दिड तास वादळी वारे व आवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. या वादळी वाऱ्यात अनेक नागरिकांच्या घरावरील, दुकान, शेतातील गोठ्यावरील पत्रे पत्रावळी सारखे उडून गेले, पावसामुळे अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरून अंगणात तळे साचले होते. ठिकठिकाणी विजेचे पोल, तारा जमीनदोस्त झाल्या आहेत. तर एका चार चाकी वाहनावर झाड कोसळून गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.

 

 

लोहारा शहरात रविवारी (दि.१८) दुपारी ४ : ३० वाजण्याच्या सुमारास अचानक आलेल्या सुसाट वादळी वारे, व आवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. तब्बल दिड तास झालेल्या अवकाळी पावसात व वादळी वाऱ्याने मोठा धुमाकूळ घातला. या पावसात छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अमोल फरीदाबादकर यांच्या दुकानासमोरील बदामाचे झाड तुटून पडून नुकसान झाले. बस स्थानकासमोरील श्री.चव्हाण यांचे पत्र्याचे शेडचे दुकानावरील पत्रे, शटर उडून मोठे नुकसान झाले. तर प्रभाग क्रमांक ९ मधील नागेश राम पांढरे यांच्या घरासमोरील आंब्याचे झाड उन्मळून पडले.

तर विजय वेदपाठक, प्रशांत थोरात, यांच्यासह आदी नागरिकांच्या घरात व जनावरांच्या गोठ्यात मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचून मोठे नुकसान झाले. तसेच प्रभाग क्रमांक ९ मध्ये कांहीं महिन्यांपूर्वी नगर पंचायत वतीने लाखो रुपये खर्चून करण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालायावरील पत्रे उडून जाऊन व वरच्या बाजूची भिंत पडून मोठे नुकसान झाले असून निकृष्ट दर्जाचे झालेल्या कामाचा वादळी वारे व पावसात पितळ उघडे पडल्याचे बोलले जात आहे. शहरातील झिंगाडे प्लॉटींग मधील मधुकर रोडगे यांच्या चार चाकी वाहनावर शिवरीचे झाड पडून गाडीचा वरील बाजूचा चेंदा मेंदा होऊन मोठे नुकसान झाले आहे. तसेच झिंगाडे प्लॉटिंगसह अनेक ठिकाणी विजेचे पोल व तारा झाडे उन्मळून पडून मोठे नुकसान झाले आहे. तसेच लोहारा येथील क्षेत्र विकास समितीच्या परिसरातील एक निलगरीचे झाड तुटून नुकसान झाले आहे. डॉ. गुणवंत वाघमोडे हॉस्पिटलसमोरील विजेच्या तारा तुटल्या, झिंगाडे प्लॉटींग मध्ये १ विजेचे पोल पडून मोठे नुकसान झाले आहे. लोहारा ते जेवळी रोडवरील ११ के. व्ही.लाईनचे २ पोल पडुन नुकसान झाले आहे. त्यामुळे शहरासह तालुक्यातील कांहीं गावाचा विज पुरवठा रात्री उशिरापर्यंत खंडित झाला होता. कास्ती (खुर्द) (ता. लोहारा) येथील शेतकरी कल्याण पांडुरंग साळुंके यांच्या शेतातील झाडाखाली बांधलेल्या म्हशीवर वादळी वाऱ्यामुळे बाभळीचे झाड कोसळून १ म्हैस जागीच ठार झाली आहे. या वादळी वाऱ्याने व पावसाने मोठ्या प्रमाणावर हजेरी लावत मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे या नुकसानीचे पंचनामे करून संबंधितास नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here