लोहारा:– मागील दोन दिवसांपासून लोहारा शहरामध्ये वाट भटकत असलेला एक लांडोर (मादी मोर) पक्षी शेपू हेड्डे व त्यांच्या मित्रांनी दक्षतेने पकडून सर्पमित्र श्रीनिवास माळी यांच्या संपर्कात आणला. माळी यांनी त्या पक्षाची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करून त्याला कोणतीही इजा झाली नाही याची खात्री केली. त्यानंतर वनविभागाशी संपर्क साधून सदर पक्ष्याला मोकळ्या जंगलात सुरक्षितरित्या सोडण्याची कार्यवाही करण्यात आली. या कार्यात पर्यावरणप्रेमी व पर्यावरण संरक्षण गतिविधीचे जिल्हा संयोजक श्रीनिवास फुलसुंदर यांच्या नेतृत्वाखाली वीरेश स्वामी, गणेश कुलकर्णी, शैलेश जेट्टे, अली हिड्डे आणि सद्दाम बागवान या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. वनविभागाच्या अधिकृत परवानगीने हा लांडोर निसर्गाच्या सानिध्यात परत सोडण्यात आला. यामाध्यमातून पक्ष्याचा जीव वाचवण्यात यश आले. दरम्यान, 11 जून 2025 रोजी, लोहारा नजीक असलेल्या तलाव परिसरात एक खंड्या पक्षी अडकलेल्या अवस्थेत आढळून आला. भावड्या कोरे यांनी याची माहिती तात्काळ पर्यावरणप्रेमी वीरेश स्वामी यांना दिली.निरीक्षणानंतर असे आढळले की पक्ष्याच्या संपूर्ण शरीराला कोणतासा चिकट पदार्थ लागला होता, ज्यामुळे त्याची हालचाल पूर्णतः बंद झाली होती. सदर पक्ष्याला तत्काळ सुरक्षित ठिकाणी आणण्यात आले व वीरेश स्वामी, श्रीनिवास माळी, बबन रनशुर आणि ज्ञानेश्वर काडगावे यांनी पेट्रोलच्या मदतीने चिकट पदार्थ साफ करून पक्ष्याला मोकळे केले. उपचारानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. लोहारा शहरातील निसर्ग संवर्धन संस्था व त्याचे पदाधिकारी गेल्या अनेक वर्षांपासून पशुपक्षी आणि पर्यावरण रक्षणासाठी उल्लेखनीय कार्य करत आहेत. अशा कार्यामुळे निसर्गप्रेमाची बीजे समाजात खोलवर रुजत असून, वन्यजीवांचे रक्षण हे केवळ शासकीय नाही, तर सामाजिक जबाबदारीही असल्याचे पुन्हा अधोरेखित होते.
Home ताज्या बातम्या लोहारा शहरात वन्य पक्ष्यांचे सुटका लांडोर व खंड्या पक्ष्यांचे प्राण वाचवले, निसर्ग...