लोहारा :– तालुक्यातील जेवळी येथील श्री गुरु सिद्धेश्वर विरक्त मठात गुरुवारी दि.10 जुलै रोजी गुरुपौर्णिमा निमित्त मठाधीश मनिप्र श्री गंगाधर महास्वामीजी यांच्या सानिध्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र- कर्नाटक सीमावर्ती या भागात वीरशैव लिंगायत संप्रदाय मोठ्या प्रमाणात आहे. वीरशैव धर्मात सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक परंपरा जोपासण्यासाठी अजूनही मठ परंपरेला महत्त्व आहे. पूर्वी बेन्नीतुरा नदीकाठी असलेल्या जेवळी येथील गुरु सिद्धेश्वर मठ हे भुकंपानंतर नव्याने पुनर्वसित जेवळी गावात जवळपास दीड कोटी रुपये लोक वाट्यातून बांधण्यात आले आहे. या मठात सातत्याने विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम पार पडत असतात. गुरुवारी दि.10 जुलै रोजी प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी गुरुपौर्णिमा निमित्त मठाधीश मनिप्र श्री गंगाधर महास्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आले आहे. सकाळी सहा वाजता येथील श्री वीरभद्रेश्वरांच्या मूर्तीस रुद्रअभिषेक, आठ वाजता श्री गुरु पाद्यपूजा, मठाधीश मनिप्र गुरु गंगाधर महास्वामीजींना भक्तांकडून महावस्त्रे प्रदान यानंतर महास्वामींचे आशिर्वचन, सकाळी दहा वाजेपासून महाप्रसादाचे वाटपाला सुरुवात होणार आहे. येथे होणाऱ्या गुरुपौर्णिमा उत्सवाला पंचक्रोशीतील भाविक भक्ताने उपस्थित राहून सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान श्री गुरु सिद्धेश्वर विरक्त मठ समितीकडून करण्यात आले आहे.


