लोहारा :– तालुक्यातील एकुण ४४ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे सन २०२५- ३० साठीचे आरक्षण सोडत कार्यक्रम गुरुवारी (दि.१०) दुपारी ४ वाजता लोहारा पंचायत समितीच्या सभागृहात घेण्यात आला. यावेळी सुप्रिया सुनिल मोरे व शिवाजी शहाजी जाधव या विद्यार्थ्यांच्या हाताने चिट्ठी काढून आरक्षण जाहीर करण्यात आले. तर अनेक गावांत सरपंच पदाचे आरक्षण आरक्षित झाल्यामुळे मातब्बर गाव पुढाऱ्यांची मोठी निराशा झाली आहे. त्यामुळे कही खुशी, तो कही गम अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पुढील सरपंच आरक्षित जरी असला तरी तो आपल्याच मर्जीतील व्हावा यासाठी आता गावच्या कारभाऱ्यांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे.तालुक्यातील ४४ गावच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम (दि.१६) एप्रिल २०२५ रोजी संपन्न झाला होता. परंतु ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन यांनी (दि.१३) जुन २०२५ रोजी जाहीर करण्यात आलेले आरक्षण रद्द केले होते. त्यामुळे गावचा कारभारी होण्याचे अनेकांचे स्वप्न धुळीस मिळाले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी (दि.३) जुलै ला आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करुन प्राधिकृत अधिकारी तथा उमरगा उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत चे नव्याने आरक्षण सोडत घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुरुवारी (दि.१०) तालुक्यातील ४४ गावच्या ग्रामपंचायतीचा सन २०२५-३० या पाच वर्षाचा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी तहसीलदार रणजितसिंह कोळेकर, नायब तहसीलदार नाना मोरे, रतन काजळे, प्रभारी गटविकास अधिकारी जे.टी.वग्गे, यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शिवसेना लोहारा तालुका प्रमुख जगन्नाथ पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष शिवशंकर हत्तरगे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शामसुंदर तोरकडे, काँग्रेस ओबीसी विभागाचे लोहारा तालुकाध्यक्ष दत्तात्रय गाडेकर, ऍड.सयाजी शिंदे, बसवराज वकील, रब्बानी नळेगावे, महादेव कार्ले, योगेश देवकर, शहाजी जाधव, पंचाक्षरी चव्हाण, निवडणूक विभागाचे वजीर आत्तार, यांच्यासह विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
लोहारा तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतीचे आरक्षण याप्रमाणे सोडण्यात आले.
अनुसुचित जाती :-दक्षिण जेवळी, फनेपुर, वडगाव वाडी, हराळी,
अनुसूचित जाती महिला :-विलासपुर पांढरी, चिंचोली रेबे, जेवळी उत्तर,
नागरिकांचा मागास प्रवर्ग :-हिप्परगा (रवा), नागुर, कास्ती (बु), कानेगाव, हिप्परगा (सय्यद), वडगांव (गांजा),
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला :-माळेगाव, बेलवाडी, लोहारा (खुर्द), धानुरी, तोरंबा, आष्टा कासार,
खुला प्रवर्ग :-खेड, राजेगाव, अचलेर, दस्तापुर, उदतपुर, सास्तुर, चिंचोली काटे, सालेगाव, आरणी, एकोंडी (लो), करवंजी, माकणी,
खुला प्रवर्ग महिला :-उंडरगाव, कोंडजीगड, मोघा (बु), नागराळ (लो), बेंडकाळ, भातागळी, कास्ती (खुर्द), मार्डी, भोसगा, तावशीगड, मुर्शदपुर, होळी, करजगाव,


