शेतकऱ्यांसाठी परदेश अभ्यास दौरा : ५ शेतकऱ्यांची होणार निवड ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

0
106

धाराशिव :–  शेतकऱ्यांच्या ज्ञानात वाढ करणे, त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती मिळवून देणे आणि शेतीतील उत्पादनात वाढ साधणे या उद्देशाने राज्य शासनाकडून सन २०२५-२६ मध्ये शेतकऱ्यांचे परदेश अभ्यासदौरे आयोजित करण्यात येणार आहेत.या योजनेंतर्गत जिल्ह्याला ५ शेतकऱ्यांचा लक्षांक प्राप्त झाला आहे.या अभ्यासदौऱ्यासाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांना नेदरलँड, जर्मनी,स्वित्झर्लंड,फ्रान्स,इस्त्राईल, जपान,मलेशिया,व्हिएतनाम, फिलीपाइन्स,चीन आणि दक्षिण कोरिया या देशांमध्ये पाठवण्यात येणार असून,तेथील शेती,सेंद्रिय उत्पादन,जल व्यवस्थापन, दुग्धोत्पादन,काढणीपश्चात तंत्रज्ञान व कृषी यांत्रिकीकरण अशा विविध बाबींचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे.जिल्ह्यातून एक महिला शेतकरी,एक कृषि पुरस्कारप्राप्त अथवा पीक स्पर्धा विजेता शेतकरी आणि तीन इतर शेतकऱ्यांची निवड केली जाणार आहे.इच्छुक शेतकऱ्यांनी काही महत्त्वाच्या अटींची पूर्तता करणं आवश्यक आहे.अर्जदाराचे वय किमान २५ वर्षे पूर्ण असावे,वैध पासपोर्ट असावा,शेती हे उत्पन्नाचे मुख्य साधन असावे,ॲग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी असणे आवश्यक आहे.याशिवाय शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र आणि कोरोनासंदर्भातील अहवाल सादर करणे बंधनकारक आहे.शेतकरी हा सरकारी,निमसरकारी, खाजगी नोकरीत अथवा डॉक्टर, वकील,सीए,अभियंता नसावा.तसेच त्याने पूर्वी शासकीय मदतीतून परदेश दौरा केला नसावा.अर्जासोबत ७/१२, ८अ उतारा,आधार,शिधापत्रिकेची झेरॉक्स आणि स्वयंघोषणापत्र जोडणे आवश्यक आहे.शेतकऱ्यांनी आपल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ३१ जुलै २०२५ पर्यंत अर्ज सादर करावा,असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी,धाराशिव यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हा कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here