बस झाले ‘बस’चे राजकारण. श्रेयवादाचा थिल्लरपणा नकोच!– ॲड. शितल चव्हाण

0
351

 

उमरगा  :– देशाच्या निती आयोगाने धाराशिव जिल्हा हा देशातील अतिमागस जिल्हा म्हणून घोषित केला आहे. या जिल्ह्यातील उमरगा-लोहारा भागात आजही शिक्षण, आरोग्य, रोजगार, शेतीसाठीच्या पायाभूत सुविधा, सार्वजनिक परिवहनाच्या सुविधा, पाणीपुरवठा, वीजपुरवठा, रस्ते, सांस्कृतिक सभागृहे, कुस्त्यांसाठीच्या तालीम, भव्य क्रीडा संकुले, वृद्धांसाठी विरंगुळा केंद्रे, वाचनालये, अभ्यासकेंद्रे इत्यादी सुविधांचा अभाव आहे. तालुक्यातील अनेक गावांना जोडणारे अंतर्गत रस्ते आहेत, पण त्या रस्त्यांवर धावणाऱ्या ‘एस. टी. बसेस’ मुबलक प्रमाणात नाहीत. काही ठिकाणी रस्ते खराब झाले आहेत म्हणून बसेस बंद झाल्या आहेत. आजही वाड्या-वस्त्या, तांड्यावरून शाळा-कॉलेजला अनेक विद्यार्थी पायी, सायकलने, खाजगी वाहनाने किंवा टमटम सारख्या खाजगी सुविधांच्या सहाय्याने प्रवास करतात. पावसाळ्यात पायी, सायकलने प्रवास करणारे विद्यार्थी चिंब भिजून तशाच अवस्थेत दिवस-दिवस शाळेत, कॉलेजात बसतात. गरीबी, बेरोजगारी यासह शाळेसाठी करावा लागणारा प्रवास, त्यातील असुरक्षितता हीदेखील मुलींच्या शाळा गळतीची आणि बालविवाह होण्याची प्रमुख कारणे आहेत. वीजपुरवठा, पाणीपुरवठा, रोजगारनिर्मिती आणि सार्वजनिक आरोग्य सुविधा यांबद्दल तर बोलायलाच सोय नाही.सन 2009 ला हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. मतदार संघातील लोकांनी वर्गणी गोळा करून प्रयोगशाळा सहाय्यक असलेल्या ज्ञानराज चौगुले यांना आमदार केले. नंतरची दोन ‘टर्म्स’ चौगुले हेच आमदार राहिले. सन 2024 ला साधे प्राथमिक शिक्षक असलेल्या प्रवीण स्वामी यांना जनतेने 2009 ची पुनरावृत्ती करीत वर्गणी गोळा करून आमदार केले. अलीकडे ज्ञानराज चौगुले आणि प्रवीण स्वामी यांच्या कार्यकर्त्यांत उमरगा-लोहरा भागात सुरु असलेल्या विकास कामांचे श्रेय घेण्यावरून तुंबळ वाकयुद्ध झाले. उथळ कार्यकर्त्यांची ही चर्चा पाहिली तर ही विकास कामे जणू काही आजी-माजी आमदार महोदयांनी आपापली घरदारे, शेतजमिनी वगैरे विकून केली आहेत की काय असे वाटण्याईतपत श्रेय घेण्याभोवतीच गुरफटलेली आहेत. हे सगळे पाहून या सगळ्याचे श्रेय जनतेचेच आहे कारण जनतेनेच या दोघांनाही वर्गण्या गोळा करून निवडून दिले आणि जनतेच्याच करातून ही कामे झाली असल्याने जनतेला सगळे श्रेय देऊन, अंतिमत: जनताच मालक असल्याचे मान्य करीत आपण फक्त कर्तव्यापुरते निमित्तमात्र आहोत ही वस्तुस्थिती आजी व माजी आमदाराने स्वीकारावी असा आशय असलेला लेख मी यापूर्वी दि. 28/04/2025 ला लिहिला होता. पण पुन्हा नव्या 05 ‘बसेस’च्या आगमनाने, त्यानंतर श्रेयवादाची तशीच थिल्लर लढाई सुरु झाल्याने मालक असलेल्या जनतेसमोर माजी व आजी नोकरांनी “माझे-माझे” करीत उर बडवण्याचा जो हास्यास्पद प्रसंग उद्भवला आहे, त्याबद्दल पुन्हा लिहिण्याची वेळ आमच्यावर आली आहे.

*थिल्लरपणा बंद करा!*

श्रेयवादाच्या या लढाईने एवढा अतिरेक केला आहे की सोशल मीडियावरील चर्चा, रस्त्यावरील सार्वजनिक खांब, जागोजागीचे होर्डिंग्ज याच एका कारणासाठी रंगवले गेले आहेत. असंख्य गंभीर प्रश्न आजही प्रलंबीत असलेल्या मागास भागात आपल्या कामाचा व कर्तव्याचा भाग म्हणून केलेल्या कामासाठी ही जी ‘शो’बाजीची स्पर्धा रंगली आहे, तिचा जनतेला अक्षरश: विट आला आहे. ‘भीक नको पण कुत्रं आवर’ असे म्हणण्याची वेळ आलेली आहे. दोन्ही बाजूने चाललेला हा थील्लरपणा आता बंद झाला पाहिजे.

*’एस.टी. बसेस ची मागणी एस. टी. महामंडळाच्या धाराशिव विभागाने सर्वप्रथम केली होती, श्रेय मात्र आजी व माजी आमदार घेत आहेत.*

एस. टी. महामंडळाच्या धाराशिव विभागाने या विभागातील कळंब, धाराशिव, तुळजापूर व उमरगा या चार आगारांसाठी एकुण 126 ई – बसेस ची मागणी दोन वर्षांच्या पूर्वीच आपल्या वरिष्ठांकडे केली असल्याबाबतची बातमी *दैनिक दिव्य मराठीने दि.07/12/2024 रोजी धाराशिव जिल्हा पुरवणीत* प्रसिद्ध केली होती. त्यापैकी 28 ई-बस उमरगा आगारासाठीच्या आहेत. याचाच अर्थ बसची मागणी सर्वप्रथम एस. टी. महामंडळाच्या धाराशिव विभागाने केली, श्रेय मात्र आजी व माजी आमदार घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत.

*प्रलंबित समस्यांचे श्रेय कोण घेणार?*

एकूण 28 ई-बस ची मागणी असताना आत्ता 5-5 अशा दोन टप्प्यात फक्त 10 बस आलेल्या असतानाच त्यावरून एवढा गोंधळ सुरु आहे, उर्वरित 18 बस अजून पर्यंत आल्याच नाहीत याचे श्रेय कोण घेणार? तालुक्यातील विकास कामांचा मंजूर झालेला निधी रखडलेला आहे, यांचे श्रेय कोण घेणार? वीज, पाणीपुरवठा, रोजगार निर्मिती, शेती क्षेत्रातील समस्या, आरोग्य क्षेत्रातील समस्या अशा समस्यांचे श्रेय कोण घेणार? दिवसा ढवळ्या ‘मर्डर’ होताहेत याचे श्रेय कोण घेणार? अवैध धंदे, गुंडगिरी थांबता थांबत नाहीये यांचे श्रेय कोण घेणार? तथाकथित विकासाच्या कामांच्या निकृष्ट दर्जाचे श्रेय कोण घेणार?

*शिवसेना-उबाठाच्या आमदाराकडून गद्दार म्हंटल्या गेलेल्यांचे सत्कार, औक्षणें, फटाके फोडून स्वागत. ‘प्रवीण गुरुजी, निकले फर्जी?’ – कार्यकर्त्यांध्ये संभ्रम.*

सद्य आमदार प्रवीण स्वामी हे विधानसभा निवडणूकीच्या उमेदवारिचा फॉर्म भरेपर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक असल्याने त्यांचा प्रत्यक्ष राजकारणाशी काहीही संबंध नव्हता. या अर्थाने ते राजकारणी नव्हते. त्यांना निवडून देण्यामागे शिवसेना शिंदे गटाला गद्दार म्हणत त्या गटाविरुद्ध आक्रमकपणे लढणाऱ्या शिवसेना (उबाठा)च्या निष्ठावान शिवसैनिकांचे फार मोठे योगदान आहे. शिवसेना पक्ष फुटल्यांनतर फुटून गेलेल्या आमदारांना ‘खोकेबाज’ व ‘गद्दार’ ठरवत शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी फुटीर आमदारांचा आजवर दुस्वास केला आहे. एवढेच काय दोन्ही गटाचे प्रमुख आजही एकमेकांसमोर आल्यावर एकमेकांकडे बघणे देखील टाळत आहेत, इतके वितुष्ट या दोन गटात आलेले आहे. आजही निष्ठावंत शिवसैनिक गद्दार ठरवलेल्याना आपल्या सावलीलादेखील उभे करणे पसंत करीत नाहीत. अशी परिस्थिती असताना, ‘गद्दार विरुद्ध निष्ठावंत’ हीच या राजकीय लढाईची प्रमुख भूमिका बनलेली असताना उमरगा-लोहारा मतदार संघाच्या शिवसेना (उबाठा) आमदार महोदयांनी मात्र गद्दार गटातील प्रतापराव सरनाईक यांसह स्थानिक नेत्यांना आपल्या घरी बोलावून, त्यांचे आतिषबाजी करून स्वागत करणे, औक्षण करणे असा प्रकार केल्याने शिवसेना (उबाठा) कार्यकर्त्यांसह महाविकास आघाडीतील घटक पक्षांना धक्का बसला आहे. इथले नवखे आमदार थेट पक्षाच्या भूमिकेशी विसंगत वागत असल्याने ज्यांना ‘सबकी मर्जी, प्रवीण गुरुजी’ असे म्हणत निवडून आणले, त्यांना आता ‘प्रवीण गुरुजी, निकले फर्जी’ असे म्हणण्याची वेळ तर येणार नाही ना?, अशी कुजबुज कार्यकर्त्यांमध्ये सुरु झाली आहे. किंबहूना अशी चर्चा विरोधी लोकांनीच पसरवली आहे आणि ती पसरवण्यास पूरक कृती आमदार महोदयांकडून करून घेतल्या जात आहेत. अर्थात शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे गळ्यात शिवलिंग असेल तोपर्यंत हातात उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे शिवबंधन असेल ही निष्ठा ते पाळतील याबद्दल दुमत नाही पण पक्षाच्या, कार्यकर्त्यांच्या व स्थानिक पुढाऱ्यांच्या ताठर भूमिकेस पूरक भूमिका नसणे हेदेखील कार्यकर्त्यांना दुखावणारे, विरोधकांद्वारे संभ्रम निर्माण करण्यास वाव देणारे ठरते.माजी आमदार महोदयांना गद्दार, खोकेबाज ठरवत त्यांच्यावर कडक टीका करत सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी रोष पत्करला, त्याच माजी आमदारासोबत आपल्या गटाचे आमदार हसत गळाभेटी घेताना पाहून आपण वेड्यात निघालो आहोत अशी भावना सर्वसामान्य कार्यकर्त्यामध्ये निर्माण झाली आहे आणि त्यांचा सद्य आमदाराच्या ताठर भूमिकेवरील विश्वास डळमळीत झाला आहे.

*’नाही रे’ वर्गाने ‘आपला’ म्हणून निवडून दिलेले आमदार फोटोबाजीत व प्रस्थापितांच्या घोळक्यात मशगुल झाले आहेत काय?*

प्रवीण स्वामी यांना सर्वसामान्य जनतेने आमच्यातलाच एक समजून निवडून दिले आहे. ‘गब्बर विरुद्ध गरीब’ अशा लढाईत ‘गरीब’ म्हणून त्यांना निवडून दिले गेले आहे. अशा परिस्थितीत त्यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याला केंद्रास्थानी ठेवून कारभार करायला हवा. पण निवडून जाताच त्यांच्या वर्तनात बदल दिसून येऊ लागले आहेत. सतत फोटोसेशन करणे, ते सोशल मीडियावर फिरवत राहणे, एखादा नवखा कार्यकर्ता नेता दिसताच त्याच्या शेजारी जात फोटो काढून घेण्यासाठी धडपडतो व त्या फोटो तात्काळ सोशल मीडियावर फिरवतो तशाच प्रकारचे वर्तन आमदार पदाची गरीमा विसरून ते करीत असल्याचे सर्वत्र बोलले जाते आहे. तसेच विविध पक्षाच्या आणि बहुतांश करून आपल्या विरोधी पक्षाच्या मातब्बर नेते मंडळीसोबत फोटोसेशल केले जात आहे व ते तत्परतेने व्हायरल केले जात आहे, याबद्दलही सर्वसामान्यामध्ये नाराजीचा सूर निघत आहे. ‘नाही रे’ वर्गाने ‘आपला’ म्हणून निवडून दिलेल्या आमदाराने इतक्या कमी कालावधीत असे प्रस्थापितांसोबत व खासकरून विरोधी पक्षाच्या प्रस्थापितांसोबत व फोटोसेशन्समध्ये गुरफटून जाणे सर्वसामान्य लोकांना रुचत नाहीये. याबाबत लोकांमध्ये उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

*आमदार महोदयांच्या बदलत्या वर्तनुकीचा फटका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकांत बसू शकतो.*

सन 2024 साली उमरगा – लोहारा भागात झालेल्या सत्ता परिवर्तनासाठी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष, इतर सामाजिक संघटना, चळवळीतील कार्यकर्ते यांचे योगदान महत्वाचे आहे. पण निवडणूक संपताच ही बांधणी कोलमडून पडली. निवडून आलेल्या आमदार महोदयांनी ज्यांची ज्यांची मदत निवडून येण्यासाठी घेतली त्यांच्यासोबतचा संवाद मर्यादित केला. निर्णय प्रक्रियेत सर्वांना सामावून घेणे थांबले. “लढताना सगळे आणि कारभार हाकताना ‘एकला चलो रे’ ..” अशी कार्यपद्धती पुढील रणनीतीसाठी घातक ठरु शकते. त्यातच गद्दारांसोबत गळाभेटी झाल्याने ‘गद्दार विरुद्ध निष्ठावंत’ हा लढाईत मुख्य प्रेरणा ठरणारा घटक क्षीण झाला. निवडणूकी नंतर जर सगळे मातब्बर एक होणार असतील तर आम्ही कोणासाठी व कशासाठी लढावे ही भावना बळावली. एकंदर पाहता भूमिका, विचार, धोरण यावरचा विश्वास उडाला. प्रवीण गायकवाड यांच्यासारख्या चळवळीतल्या नेत्यावर हल्ला झाल्यावर जी बोटचेपी भूमिका घेतली गेली, त्यामूळे पुरोगामी समर्थक दुःखावले गेले. राज्य सरकारच्या धोरणांविरुद्ध आक्रमकता न दाखवल्याने कार्यकर्त्यामध्ये ‘स्पिरिट’ उरला नाही. या सगळ्या कारणाने येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत ‘मविआ’ साठी अनेक आव्हाने उभी ठाकली आहेत. स्वत:ची निवडणूक जिंकून झाल्यानंतर आता कार्यकर्त्यांच्या निवडणूकांत या आव्हानांचा सामना करीत, कार्यकर्त्यांना निवडून आणत त्यांना न्याय देण्याची नैतिक जबाबदारी आता आमदार प्रवीण स्वामी यांच्यावर आहे.

*सुधारणेला वाव व वेळ आहे.*

श्रेयवादाच्या उथळ लढाईतून विनम्र माघार घेणे, विकास कामांचे सगळे श्रेय जनतेलाच देण्यासाठी आग्रही राहणे, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सर्व ठिकाणी प्राधान्य देणे, निवडणूकीत सोबत असलेल्यांची पुनर्बांधणी करणे, अनावश्यक फोटोसेशन्सला आवर घालणे, लोकांचे प्रश्न सोडवण्याला प्राधान्य देत हे करणारी सक्षम यंत्रणा उभी करणे, भूमिकांच्या बाबतीत ताठर राहणे, आपल्या पदाची गरिमा सांभाळणे, कार्यकर्त्यांचा ‘स्पिरिट’ टिकवून ठेवणे या मार्गाने नूतन आमदार त्यांच्या समोर असलेली येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीची आव्हाने पेलू शकतात. ते अशा प्रकारच्या सुधारणांचा सकारात्मक स्वीकार करून पुढील मार्गक्रमण करतील अशी आशा तूर्तास करूया व त्यासाठी त्यांना सदिच्छा देऊया.

© ऍड. शीतल शामराव चव्हाण,(मो. 9921657346)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here