उमरगा – कै.भीमराव नाईक माध्य.आश्रमशाळा होळी येथील विज्ञान शिक्षक श्री.सुधीर कांबळे यांची महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे शास्त्र विषय समिती सदस्य म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.राष्ट्रीय शेक्षणिक धोरण 2020 वर आधारित येऊ घातलेल्या नवीन अभ्यासक्रम व पाठ्यक्रम विषयक पाठयपुस्तके आणि पूरक साहित्य निर्मितीसाठी बालभारतीने सर्व विषयांच्या समित्यांची पुनर रचना केली असून शास्त्र विषयाच्या विषय समितीवर कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारावर ही निवड करण्यात आली आहे. या पूर्वीही श्री.कांबळे हे अभ्यासक्रम मंडळात शास्त्र विषय समिती सदस्य म्हणून कार्यरत होते याशिवाय राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे आणि महाराष्ट्र राज्य माध्य व उच्च माध्य परीक्षा मंडळात आणि यशदा येथेही विज्ञान विषयतज्ञ म्हणूनही ते कार्यरत आहेत.अभ्यासक्रम निर्मिती, पाठय पुस्तक निर्मिती आणि संशोधनासह शैक्षणिक क्षेत्रातला अनुभव लक्ष्यात घेता सदर निवड केल्याचे नियुक्ती करण्यात आल्याचे नियुक्ती पत्रात मा. संचालक यांनी म्हटले आहे.या प्रकारे नियुक्ती होणारे श्री.कांबळे हे इतर मागास व बहुजन कल्याण विभागातंर्गत चालणाऱ्या आश्रमशाळेतील एकमेव शिक्षक असून त्यांच्या या निवडीबद्दल संस्था अध्यक्ष बाबुराव राठोड,सदस्य डॉ.संजय राठोड आणि प्राचार्य डोंबाळे यांनी अभिनंदन केले आहे.


