मुरूम :– पालिका प्रशासनाकडून श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750 व्या जयंती निमित्त 15 ऑगस्ट रोजी शहरातील प्रमुख मार्गावरून वाजतगाजत माउलींची पालखी मिरवणूक काढण्यात आली होती.यानिमित्त येथील वारकरी संप्रदायाने मुख्याधिकारी सचिन भुजबळ व पालिका प्रशासनाचे अभिनंदन करत प्रतिवर्षी जयंती साजरी करण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती केली आहे.
याबाबत वारकरी संप्रदायाने लिहिलेल्या पत्रात म्हंटले आहे की,पालिका प्रशासनाने माऊलींच्या 750 व्या जयंती निमित्त शहरातून वाजतगाजत मिरवणूक काढली.या मिरवणुकीत शहरातील वयोवृद्ध, महिला व बालगोपाल मोठ्या संख्येने सहभागी होऊन टाळ मृदुंगाच्या गजरात नाचत माऊलींच्या भक्तीत तल्लीन झाले होते.शहर वासीयांना भक्तिमय वातावरण उत्साहित होऊन ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष करत असतांना पाहून आम्हा वारकरी संप्रदायाला अभिमान वाटतो. शहराच्या इतिहासात पहिल्यांदा पालिका प्रशासनाच्या पुढाकाराने अशा प्रकारे माउलींची पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता.हा उपक्रम आम्हा वारकऱ्यांसाठी अभिमानाचा व गौरवाचा क्षण होता.असे उपक्रम पुढच्या पिढीला शेकडो वर्षाच्या संत परंपरेची आठवण करून देत राहील.यामुळे असे उपक्रम व पालखी सोहळे दरवर्षी पालिका प्रशासनाने आयोजित करावे अशी विनंती पालिकेचे मुख्याधिकारी सचिन भुजबळ यांच्याकडे पत्राद्वारे केली असून पालिकेच्या पुढाकाराने काढण्यात आलेल्या पालखी सोहळ्याच्या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


