उमरगा :- तालुक्यातील नाईचाकूर गावातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेत दि.25 ऑगस्ट रोजी मध्यरात्री भीषण चोरीची घटना घडली असून, शाखेत तिघा अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून तब्बल १९ लाख ३१ हजार रुपये चोरी करून लंपास केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी साडेनऊ वाजता बँकेचे सेवक विष्णू वाघमोडे हे बँक उघडण्यासाठी आले. गेट उघडून मधल्या दरवाजाला गेल्यानंतर कुलपाला हात लावले तर कुलूप उघड असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी तात्काळ बँकचे शाखा व्यवस्थापक आशिष बनसोडे यांना फोन लावला. बँकेचे बाहेरील दरवाजाचे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कुलूप तोडले असे सांगितले.तातडीने बँकचे शाखा व्यवस्थापक बनसोडे व इतर कर्मचारी बँकेत आले त्यानंतर पोलिसांना माहिती कळविली. मध्यरात्री चोरट्यांनी बँकेच्या पाठीमागील लोखंडी खिडकी तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर गॅस कटरच्या सहाय्याने तिजोरी कापण्यात आली. तिजोरी फोडून त्यातील रोकड चोरट्यांनी लंपास केली. घटनेदरम्यान परिसरात कुणालाही संशय न येता चोरटे फरार झाले.घटनेची माहिती मिळताच उमरगा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या चोरीच्या घटने मुळे नाईचाकूरसह परीसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.यानिमित्ताने ग्रामीण भागातील सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. बँक व पोलीस प्रशासनाने तातडीने सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्याची गरज व्यक्त होत आहे. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक सदाशिव शेलार, पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक रामहरी चाटे, पोलीस कॉस्टेबल व्ही .जी. साळुंखे ,सतीश पाटील पोलीस पाटील बाळू स्वामी पुढील तपास करत आहेत.
- चोरीचा घटनाक्रम
चोरट्याने तोंडाला मास्क लावल्यामुळे बँकेतील सीसीटीव्ही कॅमेरात चेहरा दिसत नाहीत. बँकेत प्रवेश केल्यानंतर समोरील कॅमेऱ्यावर चोरट्यांनी स्प्रे मारला.त्यानंतर गॅस कटरच्या साह्याने लॉकर तोडण्यात आले.सीसीटी कॅमेरा चोरी करणारे व्यक्ती एक वाजून पाच मिनिटांनी बँकेत प्रवेश केला.त्यानंतर तीन वाजता बँकेच्या बाहेर चोरी करून पडले तीन तास चोर बँकेत होते.समोरील गेटचे कुलूप न तोडता कंपाउंड वरून वर चढून बँकेत प्रवेश केला. समोरील चैनल गेट गेलं तोडून प्रवेश करून चोरट्याने गॅस कटरच्या साह्याने तिजोरी तोडली.


