प्रशिक्षक निलकंठ माने यांचा भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल मोरे, उपाध्यक्ष अश्लेष मोरे यांच्या हस्ते सत्कार

0
185

धाराशिव :- जिल्ह्यातील भूमिपुत्र कोच निलकंठ श्रीधर माने यांनी आपल्या अथक परिश्रम, सातत्यपूर्ण मेहनत आणि क्रीडाक्षेत्रातील प्रखर निष्ठेमुळे आणखी एक मोठे यश संपादन केले असून, या यशाबद्दल भारत शिक्षण संस्था उमरगा चे अध्यक्ष अमोल मोरे ,उपाध्यक्ष अश्लेष मोरे यांनी त्यांचे अभिनंदन करून सत्कार केले. नुकतेच त्यांनी आंतरराष्ट्रीय शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशन (ISSF) या जागतिक दर्जाच्या संस्थेकडून ISSF B लेव्हल कोच परवाना (Licence) मिळवून महाराष्ट्राचं आणि भारताचं नाव जगभर उज्ज्वल केलं आहे.या यशासाठी त्यांनी फिनलंडमधील Kisakallio Sports Institute, Lohja येथे 1 ते 5 सप्टेंबर 2025 दरम्यान आयोजित ISSF Academy International Shooting Sport Coach B Course मध्ये यशस्वीरीत्या सहभाग घेतला. या कोर्समध्ये २४ राष्ट्रांतील ५२ प्रशिक्षक सहभागी झाले होते. या सर्वांमध्ये महाराष्ट्रातून निलकंठ माने यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली. निलकंठ माने यांचे शालेय शिक्षण भारत शिक्षण संस्थेच्या भारत विद्यालय, उमरगा येथे झाले असून,लहानपणापासूनच त्यांची भारतीय सैन्यात जाण्याची प्रबळ इच्छा होती. त्या स्वप्नासाठी त्यांनी एनसीसी (NCC) मध्ये प्रवेश घेतला.लातूर येथे 53 MH BN NCC द्वारे आयोजित शिबिरात त्यांनी भाग घेतला.या शिबिरात रायफल शूटिंगमध्ये पदक जिंकून त्यांना या क्रीडेबद्दलची खरी आवड निर्माण झाली.त्यानंतर त्यांनी थळ सैनिक कॅम्प (TSC) साठी महाराष्ट्राच्या संघात निवड मिळवली आणि आंतरगट स्पर्धेत आपल्या संघाला प्रथम क्रमांक मिळवून दिला.यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढवला त्यांनी आपला मार्ग फक्त एनसीसीपुरता मर्यादित ठेवता रायफल व पिस्तूल शूटिंगकडे वळवला .एनसीसीनंतर निलकंठ माने पुण्यातील M.E.S Shooting Range मध्ये 10 मीटर एअर पिस्तूल (ऑलिंपिक इव्हेंट) या प्रकारात स्पर्धा खेळू लागले. येथे त्यांचे पहिले व्यावसायिक कोच आनंद बोराडे सर होते.

 

“बोराडे सरांनी केवळ तांत्रिक मार्गदर्शनच केले नाही, तर संकटाच्या काळात नैतिक आधार व मानसिक बळ दिलं. त्यांच्या प्रोत्साहनामुळेच मी कठीण प्रसंगांना तोंड देऊ शकलो.” – निलकंठ माने

या काळात त्यांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. स्पर्धेचे शुल्क, प्रवास, उपकरणे आणि राहणीमानाचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी पुण्यात एका मॉलमध्ये सेल्समनची नोकरी केली. दिवसभर नोकरी, सराव आणि स्पर्धा असा तिहेरी ताण असूनही त्यांनी हार मानली नाही.फक्त दीड वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर त्यांनी वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. त्यानंतर त्यांची निवड भारतीय संघाच्या सिलेक्शन ट्रायल्ससाठी (Indian Team Selection Trials) झाली. पुढे पुणे विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत त्यांनी 378/400 गुणांसह विक्रम मोडीत काढत सुवर्णपदक पटकावले.हा टप्पा त्यांच्या आयुष्यातील निर्णायक क्षण ठरला. खेळाडू म्हणून राष्ट्रीय स्तर गाठल्यानंतर त्यांच्या मनात कोचिंगची जबाबदारी स्वीकारण्याची जाणीव निर्माण झाली.पुण्यातील M.E.S Shooting Range मध्ये त्यांनी असिस्टंट कोच म्हणून कार्यरत राहून खेळाडूंना मार्गदर्शन केले.त्यानंतर त्यांनी Gun For Glory Shooting Academy, Pune मध्ये कोच म्हणून काम केले.ही अकादमी भारतातील अग्रगण्य संस्था असून भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि क्रीडा मंत्रालयाकडून विविध शासकीय पुरस्कार व मान्यता प्राप्त आहेत.या अकादमीचे संचालक व संस्थापक ऑलिंपिक पदक विजेता गगन नारंग आणि पवन सिंग आहेत.येथे काम करताना निलकंठ माने यांना उच्च दर्जाचे व्यावसायिक प्रशिक्षण मिळाले, तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रणाली व पद्धतींचे ज्ञान झाले.“Gun For Glory” ने दिलेला पाठिंबा आणि सहकार्य त्यांच्या करिअरच्या घडणीत अत्यंत मोलाचा ठरला.पुढे Hyderabad येथील FNCC – Gun For Glory Academy मध्ये ते हेड कोच बनले. सहा वर्षे त्यांनी येथे कार्य करत असताना अनेक खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर तयार केले.याच काळात त्यांनी “LOSER” या लोकप्रिय वेब सिरीजला तांत्रिक मार्गदर्शन दिले. ही वेब सिरीज शूटर्सच्या जीवनावर आधारित असून शूटिंग स्पोर्ट्सचे वास्तववादी चित्रण करण्यासाठी निलकंठ माने यांचा अनुभव आणि सल्ला महत्त्वाचा ठरला. सद्या ते भारत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा येथील शूटिंग प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here