तुळजापूर बसस्थानकांना नवे नामकरण ; नवरात्र यात्रेसाठी ५० लालपरी धावणार

0
102

धाराशिव:–  तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र यात्रेनिमित्त भाविकांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे.तुळजापूरमधील मुख्य बसस्थानकाला ‘श्री तुळजाभवानी बसस्थानक’ तर नूतनीकरण करण्यात आलेल्या जुन्या बसस्थानकाला ‘छत्रपती संभाजी महाराज बसस्थानक’ अशी नवी नावे देण्यात आली आहेत.अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.याचबरोबर यात्रेच्या गर्दीवर ताण न येता भाविकांना वेळेत सेवा मिळावी यासाठी तब्बल ५० नव्या लालपरी बसेस तुळजापूर आगारात दाखल होत आहेत. स्थानिक नागरिक व विविध सामाजिक संस्थांनी या संदर्भात परिवहन मंत्री व पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाठपुरावा केला होता. मंत्री सरनाईक यांच्या पुढाकारातून दोन्ही बसस्थानकाला नामकरण व नवीन बसेस यात्रा कालावधीत उपलब्ध झालेल्या आहेत. नवीन बसेस घटस्थापनेपासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत तुळजापूर येथून धावणार असून, तुळजापूर-सोलापूर, तुळजापूर-धाराशिव, तुळजापूर-लातूर, तुळजापूर-कोल्हापूर या मार्गांवर दररोज सुमारे २०० फेऱ्या होणार आहेत.यात्रेच्या काळात लाखो भाविक तुळजापूरला भेट देतात.त्यांची प्रवासातील गैरसोय टाळण्यासाठी या नव्या सुविधा सुरू होत आहेत. भाविकांसाठी हा निर्णय दिलासादायक ठरणार असून,नवरात्र यात्रेदरम्यान यामुळे मोठा दिलासा मिळेल,असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here