उमरगा:– तालुक्यातील कोरेगाव वाडी येथील शिवाई चॅरिटेबल ट्रस्ट, शिवाई इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग येथे वेबिनारद्वारे आत्महत्या प्रतिबंध यावर कार्यशाळा राबवण्यात आली.डॉ.अमित टाक ( एम.बी.बी.एस. एम.डी. मनोविकार तज्ञ, व्यसनमुक्ती तज्ञ) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना डॉ. अमित टाक यांनी आत्महत्येसारख्या गंभीर सामाजिक समस्येबाबत सर्वच पातळ्यांवर जागृती करणे फार गरजेचे आहे. मानसिक आरोग्याचा प्रश्न नियंत्रणाबाहेर गेल्यास आत्महत्येचे विचार सातत्याने मनात येऊ शकतात. तो विचार, तो क्षण टाळण्यासाठी समुपदेशन, वैद्यकीय मदत, संवाद साधणे, नैराश्य नेमके कोणत्या गोष्टीमुळे येते हे समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर त्या व्यक्तीला योग्यवेळी मदत मिळाली तर तो असा निर्णय घेण्यापासून परावृत्त होऊ शकतो.आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होणे ही गंभीर बाब आहे. परिणामी आत्महत्येच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. शालेय विद्यार्थी, युवक, शेतकरी, गृहिणी, वृद्ध – अशा सर्व वयोगटांमध्ये ही समस्या आढळते. ही एक मानसिक स्थिती आहे, जिथे माणूस आशा गमावतो आणि स्वतःच्या अस्तित्वाला अर्थहीन समजतो. यावर प्रतिबंध करण्यासाठी,मदतीचा हात पुढे करा,नैराश्याच्या बाबतीत, अनेक कारणांमुळे आत्महत्येचे विचार पुन्हा पुन्हा येऊ शकतात. एकाकीपणा, मद्यपान, अंमली पदार्थांचे व्यसन यासारख्या परिस्थितीमुळे आत्महत्येचे विचार वाढू शकतात. अशा परिस्थितीत, त्यांचा ट्रिगर ओळखा. नैराश्याने ग्रस्त असलेल्या व्यक्तीच्या आजूबाजूला राहा, त्यांना कुटुंब आणि मित्रांसोबत फोनवर बोलण्यास सांगा आणि उदासीन व्यक्तीला भावनिक स्तरावर बरे वाटण्यासाठी प्रयत्न करा. त्याचप्रमाणे, ड्रग आणि अल्कोहोलचे सेवन टाळा. स्वतःसाठी वेळ काढण्यासाठी, तसेच स्वतःची काळजी घेण्यासाठी त्या व्यक्तीला प्रोत्साहित करा असे त्यांनी वेबिनारद्वारे मार्गदर्शन केले.यावेळी शिवाई चॅरिटेबल ट्रस्ट शिवाई इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगचे अध्यक्ष बी.एच. बेडदुर्गे, सचिव डॉ.विजय बेडदुर्गे, उपाध्यक्ष प्रा.अजय बेडदुर्गे, प्राचार्य.अल्वीन काळे, महाविद्यालयातील प्रा. डॉ.स्नेहल धर्माधिकारी, प्रा. प्रशांत वाघमारे प्रा.शुभम सूर्यवंशी,प्रा.अविनाश चौधरी, प्रा.अभिजीत पाटील, प्रा.शहाबाज शेख , प्रा.अविनाश कुंभार, प्रा.शुभांगी बंदीचोडे, प्रा.मोनिका धुरे, व महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने या वेबिनार मध्ये जोडले गेले होते.कार्यक्रमाचे व्यवस्थापन प्रा.शुभम सूर्यवंशी प्रा.अविनाश चौधरी यांनी केले.सूत्रसंचालन प्रा. शहाबाज शेख व आभार प्रदर्शन प्राचार्य अल्विन काळे यांनी केले.


