मागील बऱ्याच दिवसापासून अख्ख्या महाराष्ट्रात अतिवृष्टी च्या पावसाने हाहाकार माजवून सोडला असून, लाखो हेक्टर जमिनीवरील खरीप पिकाची नासाडी होऊन शेतकऱ्यांच आयुष्य देशोधडीला लागलेले असताना,स्वतःला खूप तज्ञ, हुशार, चतुर, धुर्त अशा अनेक उपाध्यांचा धनी असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जणू कुंभकर्णी निद्रेच सोंग घेतले आहेत की काय अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रातील शेतकरी अनुभवतोय.
दररोज अतिवृष्टीचा पाऊस हा आपली दिवसेंदिवस उच्चांकीचे विक्रम मोडत असून, त्याच्या विक्रम मोजण्याच्या चक्कर मध्ये माझा बळीराजा, माझा माय बाप शेतकरी अक्षरशः जीवनाच्या शेवटच्या घटका मोजण्याच्या स्तरावर असताना मुख्यमंत्री फडणवीस मात्र निवांत आलिशान, ऐशो आराम जीवन जगत आहेत. फक्त मतदाना पुरतं म्हणायचं मतदार राजा आमचं दैवत आहे. आज दैवत संकटात असताना हा निवडून आलेला निष्ठावंत भक्त मात्र दैवताकडे ढुंकूनही पहायला तयार नाही. आज राज्य शासनाचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तमाम मंत्रिमंडळ, प्रमुख राजकीय पुढारी, विरोधी पक्षातील पुढारी या सर्वांनी मिळून महाराष्ट्रातील बळीराजाला बळ देण्यासाठी तातडीची आर्थिक मदत, कर्ज माफी, मानसिक मदत करण्याची नितांत गरज आहे, प्रशासनातील काही महाशय अधिकारी बोटावर मोजण्यागत शेतकऱ्याचे पंचनामे करून शासनाला पंचनामे करण्यात आले आहेत असं दाखवण्याचा सोंग करत आहेत ते न करता पंचनामेची ही बाब बाजूला ठेवून महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना सरसकट मदत करणे हे आज खूप गरजेचे आहे. खरीप हंगाम तर शेतकऱ्यांच्या हातून गेलेलाच आहे. येणारा रब्बी हंगाम ही शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची दाट शक्यता आहे. कारण सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे जमिनीतील जो पिकासाठी आवश्यक असणारा पोत असतो तो कमकुवत झाल्यामुळे रब्बी पिकातील उत्पन्न वाढीसाठी पण हानिकारक बाब आहे. त्याकरिता शासनाने कोणत्याही बाबीचा अथवा कोणत्याही पंचनामाचा घटक समोर न आणता महाराष्ट्रातील तमाम शेतकरी हे माझेच आहेत असं समजून सरसकट मदत करणे गरजेचे आहे.स्वतःला अनेक उपाद्यांचे धनी समजणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांना विश्वासात घेऊन महाराष्ट्राच्या बळीराजाला सक्षम बळ तात्काळ देणे अत्यंत गरजेचे आहे. आज गरज आहे फडवणीस यांनी आपल्या तोंडातून बळीराजासाठी वाणी काढण्याची, तोंडाला टाके मारल्या गत गप्प राहण्याची नाही. लाखो हेक्टर वरील पिकांची नासाडी झाली असून, अतिवृष्टीच्या पावसामुळे शेतातील उपजाऊ माती वाहून गेली असून फक्त खडक शिल्लक राहिलेल्या शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबर्डे मोडले आहे.

हे जर फडणवीस यांच्या बाबतीत घडलं असतं तर त्या संकटावर काहीतरी मार्ग काढले असते ना, मग महाराष्ट्रातील लाखों शेतकऱ्याचे आयुष्य उध्वस्त होत असताना ही बघ्याची भूमिका का , हा प्रश्न सर्वसामान्यांना पडल्याशिवाय राहणार नाही. मला या निमित्ताने कोणत्याही राजकारणी अथवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कोणत्याही प्रकारची टीका टिपणी अथवा आरोप प्रत्यारोपा करण्याची गरज नाही पण माझी एक शेतकरी या नात्याने महाराष्ट्राचे प्रमुख असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना कळकळीची विनंती आहे. कारण या अतिवृष्टीच्या पावसाने आमचं अख्ख आयुष्यच उध्वस्त केला आहे. आमचं जळालं आहे, आम्हाला त्रास होत आहे. म्हणून आम्ही काही कडवट शब्द आपणास बोललो असेल तरी क्षमा असावी पण एक राज्याचे प्रमुख या नात्याने आपणाकडे संबंध महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वतीने मदतीची आपणास हाक देत आहे तरी आपण तात्काळ मदत करावी हीच एक बळीराजाची नम्र विनंती. —-
महिबूब बानुबी दस्तगीर पठाण ,अधिस्वीकृतीधारक संपादक,उमरगा टाईम्स .


