प्रा. शामराव चव्हाण वाचनालयाच्या विवेकयात्रेद्वारे जमलेल्या रु.2,00,000/- च्या संसारोपयोगी वस्तूचे लोहारा तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्तांना वाटप

0
33

उमरगा. :–  प्रा. शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती वाचनालय व ऍड. शीतल चव्हाण फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी दसरा तथा विजयादशमीनिमित्त काढण्यात येणारी विवेकयात्रा यंदाही उमरगा शहरातून हुतात्मा स्मारक ते छ. शिवाजी महाविद्यालय या मार्गावर दि.02 रोजी काढण्यात आली होती. यावेळी ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विवेक यात्रेच्या माध्यमातून बाधित लोकांसाठी वस्तू, पदार्थ, कपडे व रोख स्वरूपात मदतीचे संकलन करण्यात आले होते.विवेक यात्रेच्या माध्यमातून मा. शाहुराज कदेरे यांनी 100 साड्या, माजी नगराध्यक्ष मा. रजाक अत्तार यांनी अतिवृष्टीग्रस्तांसाठी ब्लॅंकेट्स, मा. शरण स्वामी यांनी रु.15,000/- चा धनादेश, जिजाऊ ब्रिगेडने 100 साड्या, डॉ. विजयकुमार शिंदे – तुरोरी यांनी साड्या, कपडे, ब्लॅंकेट्स, बेडशीट्स, मा. सुरेशदाजी बिराजदार व मा. कमलाकर मुळे – मुळज यांनी पुस्तके, ऍड. प्रवीण तोतला व मा. दत्तात्रय सरपे यांच्या वतीने कपडे, तसेंच ऍड. शीतल चव्हाण फाउंडेशनच्या वतीने साड्या, ऊबदार कपडे, कोरडा शिदा, औषधे तसेच रोख रक्कम रु.15,000/- असे एकत्रित मिळून रु.2,00,000/- च्या मदतीचे संकलन करण्यात आले होते.विवेक यात्रेद्वारे जमलेल्या या संसारोपयोगी वस्तूचे वितरण दि.03 (शुक्रवार) रोजी ऍड. शीतल चव्हाण फाउंडेशनच्या वतीने लोहारा तालुक्यातील हिप्परगा रवा, लोहारा शहर, नागूर, भातागळी, सास्तूर व होळी या गावांमध्ये करण्यात आले. हिप्परगा रवा येथील अतिवृष्टीने घर कोसळलेले मुलाणी व इतर 10 कुटुंबिय, लोहारा शहरातील अतिवृष्टीने त्रस्त झालेला पालावर राहणारा मसनजोगी समाज, नागूर येथे अतिवृष्टीने पाण्यात वाहून गेलेले बालाजी मोरे यांचा परिवार व इतर बाधित कुटुंबिय, भातागळी येथील गरजू कुटुंबिय, सास्तूर येथील नुकसानग्रस्त शेतकरी तर होळी येथील ओढ्याकाटचे जमीन खरवडून गेलेले शेतकरी यांना ही मदत पोहोंचवण्यात आली.खरं तर या छोट्याशा मदतीने शेतकऱ्यांचे नुकसान पूर्णपणे भरून निघणार नसून या मदतीच्या निमित्ताने बाधित शेतकऱ्यांना धीर देण्याचा, या कठीण प्रसंगला तोंड देण्यासाठी बळ देण्याचा आमचा प्रयत्न आहे. सरकारनेही या बाधितांना भरघोस मदत द्यावी अशी भावना याप्रसंगी ऍड. शीतल चव्हाण व शेतकरी नेते अनिल जगताप यांनी व्यक्त केली.या मदत कार्यात ऍड. शीतल चव्हाण, शेतकरी नेते अनिल जगताप, अमोल बिराजदार, ऍड. सयाजी शिंदे, राजू बटगिरे, राजू भालेराव, किशोर बसगुंडे, रविकिरण बनसोडे, केशव सरवदे, विजय चितली यांनी सहभाग नोंदवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here