उमरगा नगरपरिषद च्या मतदार यादीवर २,७९० हरकती

0
101

उमरगा:- येथील नगरपालिकेच्या निवडणुकीची प्राथमिक प्रक्रिया सुरू झाली असून, प्रारूप मतदार यादीत झालेल्या बदलांमुळे अनेक मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे नगरपालिकेकडे तब्बल दोन हजार ७९० हरकती अर्ज प्राप्त झाले असून,प्राप्त हरकतींचा आढावा घेऊन प्रशासनाकडून अंतिम मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. दि. २७ रोजी नगरपालिकेच्या सभागृहात उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर आणि नगर अभियंता महेश शिंदे यांच्या उपस्थितीत बैठकीत हरकतींवर चर्चा करण्यात आली. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रभागरचनेत झालेल्या फाटाफुटीमुळे आणि काही मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात नोंद झाल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तसेच मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे निवडणूक विभागाने हरकती व आक्षेप नोंदविण्यासाठी मुदतवाढ दिली होती. या कालावधीत दोन हजार ७७६ मतदारांनी वैयक्तिकरीत्या आक्षेप किंवा हरकती नोंदविल्या आहेत, तर १४ व्यक्तींनी प्रभागनिहाय मतदारांची झालेली अदलाबदल यासंदर्भात हरकती दिल्या आहेत.सभागृहातील बैठकीत उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांनी प्राप्त हरकर्तीच्या अनुषंगाने निर्णय घेऊन पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या, तर मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांनी हरकतदारांकडून प्राप्त झालेल्या म्हणण्यानुसार मतदार यादी अचूक करण्याचे निर्देश कर्मचाऱ्यांना दिले. दरम्यान, ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी दोननंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here