उमरगा उपजिल्हा रुग्णालयात पीसीपीएनडीटी कार्यशाळा उत्साहात संपन्न

0
42

उमरगा:- गर्भधारणापूर्व व प्रसूतीपुर्व लिंगनिदान प्रतिबंधक (पीसीपीएनडीटी) कायदा 1994 (सुधारित 2003) तसेच बेटी बचाव – बेटी पढाव, लिंग गुणोत्तर संतुलन आणि जनजागृती याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित कार्यशाळा पंचायत समिती सभागृहात उत्साहात पार पडली. ही कार्यशाळा धाराशिव जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सुचनेनुसार आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाचे मार्गदर्शन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर व उमरगा उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. कोमल गरड-जाधव यांनी केले. या वेळी डॉ. उदय मोरे, डॉ. अनंत मुगळे, डॉ. आशा कदम तसेच ॲड. रेणूका शेटे प्रमुख उपस्थित होते. उमरगा तालुक्यातील सोनोग्राफी केंद्रधारक, गर्भपात केंद्रधारक, स्त्रीरोगतज्ज्ञ, शासकीय व खासगी वैद्यकीय व्यावसायिक, आयएमए, फाॅग्सी, निमा संघटनांचे सदस्य, समुदाय आरोग्य अधिकारी, अंगणवाडी सेविका, ए.एन.एम., आशा कार्यकर्त्या तसेच उपजिल्हा रुग्णालयातील अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमात बोलताना वैद्यकीय अधीक्षक डॉ. कोमल गरड-जाधव यांनी,“स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी तक्रारीची प्रभावी अंमलबजावणी झाली तर शासनाच्या खबरी बक्षीस योजनेंतर्गत तक्रारदारास एक लाख रुपयांचे बक्षीस मिळू शकते,” असे आवाहन केले.ॲड. रेणूका शेटे यांनी पीसीपीएनडीटी कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदींची माहिती दिली, तर डॉ. आशा कदम यांनी घटत्या मुलींच्या प्रमाणाचे दुष्परिणाम व संतुलित लिंग गुणोत्तराचे महत्व स्पष्ट केले. डॉ. उदय मोरे व डॉ. अनंत मुगळे यांनीही मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत मुरूम ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश अरदाळे यांनी व्यक्त केले.पीसीपीएनडीटी समन्वयक अमर सपकाळ यांनी प्रास्ताविक, पदमाकर घोगे यांनी सुत्रसंचलन, तर रमेश येवते यांनी आभार मानले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राजेश तोडकर, विवेक भोसले, विजय गिरी, नागराज तेलंग, भाऊसाहेब भुरे, बालाजी माळवतकर, संजय काळे, विद्यासागर फुलसुंदर आदींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here