उमरगा:- तालुक्यातील जकेकुर येथे राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत शेतक-यांसाठी महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत महाविस्तार AI अॅप व नैसर्गिक शेती विषयक शेतकरी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन प्रकल्प संचालक आत्मा व तालुका कृषी अधिकारी उमरगा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.जकेकुर गावचे सरपंच अनिल बिराजदार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात बदलत्या हवामान परिस्थितीत शेती पर्यावरणपूरक, आर्थिकदृष्ट्या परवडणारी व आधुनिक बनविण्यासाठी नैसर्गिक शेतीचा अवलंब करणे काळाची गरज असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सय्यद यांनी राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. नैसर्गिक शेतीमुळे जमिनीची सुपीकता वाढते, सूक्ष्म जीवांचे संवर्धन होते, उत्पादन खर्च लक्षणीयरीत्या कमी होतो व शेती अधिक नफा देणारी ठरते, असे त्यांनी सांगितले. देशी बियाणे, जीवामृत, बीजामृत, घनजीवामृत, आच्छादन व पीक फेरपालट या नैसर्गिक शेतीतील महत्वाच्या घटकांवर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. रासायनिक खत व कीटकनाशकांमुळे होणारे दुष्परिणाम सांगून, नैसर्गिक शेतीमुळे शेतकऱ्यांचे आरोग्य व पर्यावरण दोन्ही सुरक्षित राहते, असे त्यांनी नमूद केले. पुढील पिढी वाचवायची असेल तर आजपासून नैसर्गिक शेती अंगीकारणे अत्यंत आवश्यक असल्याचे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले.सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक गर्जेपाटील यांनी शेतकरी उत्पादक कंपनी (FPO) संकल्पना व त्याअंतर्गत राबविता येणाऱ्या उपक्रमांची माहिती देताना सामूहिक खरेदी-विक्री, मूल्यवर्धन, प्रक्रिया उद्योग व थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या संधी स्पष्ट केल्या.
सहाय्यक कृषी अधिकारी पी. पी. जाधव यांनी शेतकऱ्यांचा डिजीटल मित्र महाविस्तार AI अॅपच्या माध्यमातून पीक सल्ला, हवामान अंदाज, कीड-रोग व्यवस्थापन तसेच शासनाच्या विविध योजना व अनुदानांची माहिती कशी मिळविता येईल, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
फळबाग लागवडीकरिता राज्य शासनामार्फत राबविण्यात येणारी स्व.भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, राज्य कृषी यांत्रिकीकरण अभियान अंतर्गत राबविण्यात येणारे विविध घटकांबद्दल सविस्तर माहिती दिली.तसेच रब्बी हंगामातील महत्त्वाची पिके हरभरा, ज्वारी, करडई या पिकांचे कीड रोग व्यवस्थापन विषयी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
कृषी सखी राधिका बिराजदार व नीता जाधव यांनी गावातील नैसर्गिक शेतीची सद्यस्थिती व पुढील नियोजन याबाबत माहिती दिली. प्रगतशील शेतकरी गोविंद जाधव व विश्वास बिराजदार यांनी नैसर्गिक शेतीतील प्रत्यक्ष अनुभव, उत्पादनातील सकारात्मक बदल, खर्चातील बचत तसेच प्रारंभी येणाऱ्या अडचणी याबाबत मार्गदर्शन केले.या शिबिरास शरद बिराजदार, दत्ता डोंगरे, प्रवीण समाने, बबन पाटील, दादा पटेल, नागनाथ बिराजदार, रवी पाटील, विठ्ठल समाने, कोमलबाई गायकवाड, उर्मिला औरादे, मंडाबाई डोंगरे, लक्ष्मीबाई चौधरी, सरोजा बिराजदार, अंजनाबाई जांभळे आदींसह गावातील महिला व पुरुष शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


