उमरगा:- शहरातील जुनीपेठ येथील एका तरुण युवकाची हत्या करुन दगडाने चेहरा ठेचून विद्रुप करुन टाकल्याची माहिती उमरगा पोलीसांना दि.4 रोजी सकाळी 8.00 वाजण्याच्या सुमारास मिळाली .
सविस्तर वृत्त , दिनांक 04 जनवरी 2026 रोजी सकाळी 8.00 वाजण्याचे सुमारास एका अनोळखी इसमांकडून फोन द्वारे माहिती मिळाली की कोरेगाव वाडी कडे जाणाऱ्या रोडच्या बाजूला एका इसमाचा खून झाला असून त्या ठिकाणी त्या इसमाचे प्रेत पालथ्या स्थितीत आहे. अशी माहिती मिळाल्याबरोबर ताबडतोब पोलीस त्या ठिकाणी पोहोचली मयताची ओळख पटविण्यासाठी प्रेतास सुलटे करून पाहिले असता त्याचा पूर्ण चेहरा दगडाने ठेचलेला दिसून आला. त्याच्या कपड्यांमध्ये कोणत्याही प्रकारची चिट्ठी किंवा ओळख पटविणारी वस्तू मिळाली नाही परंतु शर्ट च्या कॉलरवर S.K. टेलर्स असे टेलर मार्क मिळाल्यामुळे व त्याखाली मोबाईल नंबर लिहिलेला असल्यामुळे त्यावर संपर्क साधून लागलीच त्या ठिकाणी टेलरला बोलावून घेतले तसेच प्रेताच्या उजव्या हातावर गौरी असे गोंदलेले दिसून आल्याने मयताची ओळख पटविण्याचे प्रयत्न चालू झाल्यानंतर टेलर हा जुनी पेठ उमरगा येथील असून त्या ठिकाणी गौरी नावाच्या स्त्रीची विचारपूस केली असता ती स्त्री शाहूराज महादेव सूर्यवंशी याची बायको असल्याचे निष्पन्न झाले. मयताची भावजई अलकाबाई रमेश सूर्यवंशी हिला प्रेत दाखविल्याबरोबर प्रेताचे फोटो दाखविल्याबरोबर तिने ते प्रेत शाहूराज सूर्यवंशी याचे असल्याचे सांगितले. त्यानंतर तपासाला गती देण्यात आली. आतापर्यंतच्या तपासामध्ये मयताची बायको हिचे एका इसमाबरोबर असलेल्या अनैतिक संबंधातून त्याचा खून झाल्याचे निष्पन्न झाले असून पोलीस पुढील तपास करीत आहेत . अशी माहिती उमरगा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद सुर्यवंशी यांनी दिली आहे.


