धाराशिव :- दुचाकी वाहनांसाठी सुरू होणाऱ्या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक राखून ठेवण्यासाठी आगाऊ अर्ज स्वीकृती व लिलाव कार्यपद्धती उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, धाराशिव या कार्यालयामार्फत लवकरच दुचाकी वाहनांसाठी MH25BH ही नवीन नोंदणी मालिका सुरू करण्यात येत आहे.नवीन मालिका सुरू होण्याच्या दिवशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावर इच्छुक नागरिकांची गर्दी होते.त्यामुळे कार्यालयीन व्यवस्थेवर ताण पडतो तसेच नागरिकांनाही त्रास होतो. नागरिकांचा होणारा त्रास कमी व्हावा व त्यांना हवा असणारा आकर्षक व पसंतीचा नोंदणी क्रमांक उपलब्ध असल्यास तो सुलभतेने मिळावा,यासाठी इच्छुक वाहनमालकांनी विहित शुल्क भरून सोबतच्या वेळापत्रकानुसार कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत विहित नमुन्यातील अर्ज सादर करावेत.अर्जासोबत केंद्रिय मोटार वाहन नियम १९८९ चे नियम ४ तसेच महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ चे नियम ५-अ नुसार पत्त्याच्या पुराव्याची साक्षांकित प्रत (उदा. आधारकार्ड,लाईट बिल,टेलिफोन बिल इ.) सादर करणे आवश्यक आहे.तसेच आकर्षक क्रमांकासाठी देय असलेल्या विहित शुल्काचा डी.डी.अर्जासोबत जमा करणे बंधनकारक आहे. सदर डी.डी.फक्त Deputy Regional Transport Officer, Dharashiv यांच्या नावे केवळ राष्ट्रीयीकृत बँकेचा असावा.अन्य नावाचा डी.डी.बाद ठरविण्यात येईल. बँकर्स चेक स्वीकारले जाणार नाहीत. डी.डी.कमीत-कमी एक महिना वैध असावा.एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास त्यांची यादी कार्यालयीन नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात येईल.या यादीतील अर्जदारांनी अतिरिक्त रकमेचा डी.डी. सीलबंद लिफाफ्यात वेळापत्रकानुसार कार्यालयात जमा करावा. लिलावासाठी सादर होणारा अतिरिक्त डी.डी.किमान रुपये ३००/- चा असावा व तोही वरीलप्रमाणेच वैध असावा.सदर लिफाफे अर्जदार/प्रतिनिधी यांच्या समक्ष व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, धाराशिव यांच्या उपस्थितीत उघडले जातील. ज्या अर्जदाराने अधिक रकमेचा डी.डी. सादर केला असेल त्यास पसंतीचा क्रमांक वितरीत केला जाईल.एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. राखीव क्रमांकाच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत वाहन नोंदणीसाठी सादर करणे आवश्यक आहे.अन्यथा क्रमांक आपोआप रद्द होईल व फी शासनजमा होईल.दिलेली फी कोणत्याही परिस्थितीत परत मिळणार नाही किंवा समायोजित केली जाणार नाही.विहित अर्ज नमुना व प्रतिनिधीचे प्राधिकरणपत्र कार्यालयीन वेळेत कार्यालयात उपलब्ध आहे.MH25BH नवी दुचाकी मालिका — वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. आकर्षक / पसंती क्रमांक अर्ज व डी.डी.स्वीकारणे १६ ते १९ जानेवारी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजतापर्यंत.एकाच क्रमांकासाठी दोन किंवा अधिक अर्जांची यादी प्रसिद्ध करणे,१९ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजतापर्यंत.बंद लिफाफ्यात डी.डी.स्वीकारून लिलाव प्रक्रिया २० जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजता होईल.


