लोहारा :- तालुक्यातील तुळजापूर – लातूर राष्ट्रीय महामार्गावरील करजखेडा पाटीजवळ दि. 15 रोजी तिहेरी भीषण अपघात होऊन तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर चौघे जण गंभीर जखमी झाले असल्याची घटना घडली आहे.या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.
प्रत्यक्षदर्शनी कडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी एक बोलेरो जीप वाहन भरधाव वेगाने तुळजापूर-लातूर महामार्गावरून जात होते. करजखेडा पाटीजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ही अनियंत्रित बोलेरो समोरून येणाऱ्या वॅगनआर कारला प्रचंड वेगाने धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, धडकेनंतर दुसऱ्या बाजूच्या लेनमध्ये गेली आणि तिथून जाणाऱ्या स्विफ्ट कारवर आदळली.
या विचित्र तिहेरी अपघातात तीनही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला असून , अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.तर अन्य चौघे जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने धाराशिव आणि सोलापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.


