मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी केंद्र परिसरात कलम १६३ चे प्रतिबंधात्मक आदेश

0
226

 

धाराशिव :- विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ ची मतमोजणी २३ नोव्हेंबर रोजी २०२४ रोजी सकाळी ८ वाजतापासून सुरू होणार आहे. जिल्हयातील सर्व चारही मतमोजणी केंद्र परिसरात भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ चे प्रतिबंधात्मक आदेश मतमोजणीच्या दिवशी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सचिन ओंबासे लागू केले आहे.भारत निवडणुक आयोगाने १५ ऑक्टोबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणुक – २०२४ चा कार्यक्रम घोषीत केला आहे. हा कार्यक्रम घोषित झाल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अमलात आली आहे.त्याअनुषंगाने २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीची मतमोजणी होणार आहे. धाराशिव जिल्हयातील विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीच्या ठिकाणी उमेदवारांच्या सोबत त्यांचे समर्थक व कार्यकर्ते वाहनांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे.त्यामुळे निवडणुकीच्या मतमोजणीसाठी २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा मतदारसंघासाठीच्या मतमोजणी ठिकाणच्या परिसरात कायदा व सुव्यस्था अबाधित राखणेकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून उमरगा येथील स्पोर्टस हॉल,तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी इंजिनिअरिंग कॉलेज,धाराशिव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि परंडा मतदारसंघाची मतमोजणी भूमजवळील गोळेगाव येथील अनुसूचित जातीच्या मुलांची शासकीय निवासी शाळा येथे होणार आहे.धाराशिव जिल्हयातील सर्व विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणी ठिकाणच्या परिसरात दि.२३ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजतापासून ते मतमोजणीची संपुर्ण प्रक्रिया संपेपर्यंत मतमोजणी दिवशी मतमोजणी ठिकाणापासून २०० मीटर परिघाच्या परिसरात कर्मचारी / पुरवठादार उमेदवार व त्यांचे नियुक्त केलेले प्रतिनिधी व्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तिला प्रवेशास मनाई आहे.मतमोजणी कालावधीत अथवा मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या लाऊड स्पीकरचा वापर सक्षम पोलीस अधिकाऱ्यांच्या लेखी पूर्वपरवानगीशिवाय रस्त्यावर व्यासपिठावर किंवा फिरल्या वाहनांवर बसविण्यास मनाई आहे.आदर्श आचारसंहितेचा भंग होईल अशा प्रकारचे भाषण करणे,नक्कल करणे,चित्रे / चिन्हे रेखाटणे अगर त्यांचे प्रदर्शन करणे अथवा तशाप्रकारची कृती करण्यास मनाई आहे.मतमोजणी ठिकाणापासून २०० मीटर परिघाच्या परिसरामध्ये वाहनांचा वापर करणे किंवा थांबविण्यास मनाई आहे.खाजगी वाहने ही निश्चित केलेल्या वाहनतळावरच लावण्यात यावीत.( निवडणुकीच्या अनुषंगाने वापरात असलेली शासकीय वाहने वगळून ) मतमोजणी ठिकाणाच्या २०० मीटर परिघाच्या परिसरामध्ये कोणत्याही व्यक्तीने मोबाईल फोन,कार्डलेस फोन वायरलेस सेट किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक साहित्य बाळगणे वापरण्यास मनाई आहे . भारत निवडणुक आयोगाने प्राधिकृत केलेले अधिकारी व मतमोजणीसाठीच्या कामाशी निगडीत कर्मचारी याला अपवाद असतील.मतमोजणी ठिकाणी उमेदवार, मतमोजणी प्रतिनिधी वा इतर प्रतिनिधी यांनी मोबाईल वापरणे किंवा फोटो काढणे अथवा चित्रीकरण करणे तसेच गोपनियतेचा भंग होईल अशी कृती करण्यास मनाई आहे.मतमोजणी ठिकाणापासून २०० मीटर परिघाच्या परिसरामध्ये कोणत्याही व्यक्तीने ( शस्त्र अधिनियम 1959 व नियम 2016 मधील तरतुदी प्रमाणे ) कोणत्याही प्रकारची शस्त्रे व दारुगोळा इत्यादीची वाहतुक करणे, जवळ बाळगणे अथवा वापर करण्यास मनाई आहे.सुरक्षेच्या कारणास्तव नेमलेले पोलीस अधिकारी / कर्मचारी याला अपवाद असतील.इन्स्ट्राग्राम,व्हॉटसअप द्विटर,फेसबुक,इत्यादी समाज माध्यमाद्वारे जातीय तणाव निर्माण करणाऱ्या गोष्टी पसरवण्यास मनाई आहे.मतमोजणी ठिकाणाच्या २०० मीटर परिघाच्या परिसरामध्ये कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे वाद्य वाजविणे,गाणी वाजविणे,गाणी म्हणणे,गुलाल उधळणे, वाहनांच्या सायलेन्सरच्या पुंगळ्या काढून मोठयाने आवाज करण्यास,गुलाल,रंग उधळणे अशा प्रकारचे गैरशिस्त वर्तन करण्यास मनाई करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारे जातीय तणाव निर्माण करणाऱ्या मजकुराचे प्लेक्स बोर्डस व आक्षेपार्ह घोषणा देण्यास मनाई करण्यात आली आहे.या आदेशाचा कोणत्याही प्रकारे भंग केल्यास,ती व्यक्ती भारतीय न्याय संहितेच्या कलम २३३ प्रमाणे तसेच मतमोजणीसाठीच्या गोपनीयतेचा भंग झाल्यास लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहणार असल्याचे आदेशात नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here