औसा:- मतदारसंघातील 8442 कुटुंबांना तर महाराष्ट्रातील 20 लाख कुटुंबांना पीएम आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत घरकुलांच्या मंजुरी पत्रांचे वाटप करण्यात आले. देशाचे गृहमंत्री अमितजी शाह यांच्या शुभहस्ते व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत, प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत दि.22 रोजी राज्यातील विक्रमी 20 लाख गरीब कुटुंबांना मंजुरी पत्रांचे आणि त्यातील 10 लाख कुटुंबांना पहिल्या हफ्त्याचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास पंचायत समिती, औसा येथे आ.अभिमन्यु पवार उपस्थित होते. औसा मतदारसंघातील गावांमध्ये व पंचायत समिती येथे पार पडलेल्या कार्यक्रमांच्या माध्यमातून औसा मतदारसंघातील 8442 कुटुंबांना मंजुरी पत्रांचे आणि 4000 पेक्षा अधिक कुटुंबांना पहिल्या हफ्त्याचे वाटप करण्यात आले. दि.19 डिसेंबर 2024 रोजी अधिवेशनात आ. अभिमन्यु पवार यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करून ग्रामीण भागासाठीच्या आवास योजनांचे अनुदान वाढवावे यासाठी पाठपुरावा केला होता. यावेळी आ.अभिमन्यु पवार बोलताना म्हणाले की, मला सांगताना अत्यानंद होत आहे की आज मुख्यमंत्री महोदयांनी आवास योजनांचे अनुदान 50 हजार रुपयांनी वाढविणार असल्याची घोषणा केली आहे. या वाढीव अनुदानाचा लाखो लाभार्थी कुटुंबांना फायदा होणार आहे. “एखाद्या राज्यातील कुटुंबांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर घरकुले मंजूर होण्याची ही पहिलीच घटना आहे. महाराष्ट्रासाठी सुरुवातीला 6.50 लाख घरांचे उद्दिष्ट मंजूर झाले होते. पण देवेंद्रजींनी केंद्र सरकारकडे दमदार पाठपुरावा करून अतिरिक्त 13.50 लाख घरांचे उद्दिष्ट मंजूर करून आणले. देवेंद्रजींच्या पाठपुराव्याच्या फलस्वरूप महाराष्ट्रातील 20 लाख कुटुंबांना आणि औसा मतदारसंघातील 8442 कुटुंबांना स्वतः च्या हक्काचे पक्के घर मिळत आहे. आजचा कार्यक्रम हा खऱ्या अर्थाने अंत्योदयाच्या संकल्पनेला सत्यात उतरवणारा आहे” असे यावेळी सांगितले. महाराष्ट्रातील 20 लाख कुटुंबांचे घराचे स्वप्न पूर्णत्वास नेल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, केंद्रीय गृहमंत्री अमितजी शाह, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहानजी व राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमारजी गोरे यांचे आ.अभिमन्यु पवार यांनी मनःपूर्वक आभार मानले.


