बेलकुंड – चिंचोली सोन एमआयडीसीच्या प्रस्तावित जमिनीचे भूसंपादन करण्याचे आदेश निर्गमित — आ.अभिमन्यु पवार
लोहारा :- 2 दिवसांपूर्वीच उद्योग विभागाने महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात, महामहिम राज्यपाल यांच्या आदेशाने अधिसूचना प्रसारित करून औसा तालुक्यातील बेलकुंड व चिंचोली सोन येथील 248 हेक्टर क्षेत्राला औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित केले होते, त्यानंतर आज तातडीने बेलकुंड – चिंचोली सोन एमआयडीसीच्या प्रस्तावित जमिनीचे भूसंपादन करण्याचे शासकीय आदेश निर्गमित करण्यात आले आहेत, अशी माहीती आ.अभिमन्यु पवार यांनी दिली. बेलकुंड – चिंचोली सोन एमआयडीसीचा विषय जलद गतीने आणि प्राधान्याने हाताळत असल्याबद्दल राज्याचे कार्यतत्पर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उद्योग मंत्री उदयजी सामंत व पालकमंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज यांचे आ.अभिमन्यु पवार यांनी मनःपूर्वक आभार मानले आहे. भूसंपादनाची कार्यवाही पारदर्शक पद्धतीने आणि सलगतेने व संमतीने पार पाडण्याचे शासनाचे धोरण आहे. शासकीय निकषांनुसार योग्य तो मोबदला जमीन मालकांना मिळेलच, पण बेलकुंड – चिंचोली सोन एमआयडीसी हे तुमच्या लेकरा बाळांच्या उज्वल भविष्याच्या दृष्टीने पडलेले पाऊल आहे ही बाब विचारात घेऊन, भूसंपादनाची कार्यवाही जलद गतीने पार पाडण्यासाठी जमीन मालकांनी प्रशासनाला योग्य ते सहकार्य करावे असे आवाहन आ. अभिमन्यु पवार यांनी केले आहे.