लोहारा :- तालुक्यातील जेवळी येथील अभियंता महेश ढोबळे यांची टेक्नीमॉंट गॅस प्रोसेस कंपनी, इटली व ॲडनोक अबुधाबी नॅशनल ऑइल, संयुक्त अरब अमिराती या कंपनीच्या व्यवस्थापकपदी निवड झाली आहे. सदरील कंपन्यांची गॅस उत्खनन व प्रक्रिया उद्योगात संयुक्त भागीदारी आहे. एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील अभियंता महेश ढोबळे यांची या आंतरराष्ट्रीय कंपनीत व्यवस्थापक (प्लॅनिंग मॅनेजर) पदी निवड झाल्याबद्दल परिसरात कौतुक होत आहे. जेवळी येथील रहिवाशी असलेले अभियंता महेश माणिक ढोबळे यांचे प्राथमिक व विद्यालयीन शिक्षण जेवळी येथील श्री बसवेश्वर हायस्कूल येथे झाले आहे. बारावी हे लातूर येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातून तर बीई मेकॅनिकलची पदवी ही प्रवरा इंजीनियरिंग महाविद्यालय लोणी येथून प्राप्त केली आहे. पुणे येथील निकमार महाविद्यालयातून एमबीए पूर्ण झाल्यानंतर ते भारतात गॅम्मन इंडिया कंपनी (छत्तीसगड), एल अँड टी महाजनको कंपनी (नागपूर), एल अँड टी हायड्रोकार्बन कंपनी (वडोदरा) रिलायन्स ऑइल अँड गॅस प्रोजेक्ट कंपनी (जामनगर) या ठिकाणी प्लॅनिंग मॅनेजर म्हणून काम पाहिले आहेत. आता इटली येथील टेक्नीमॉंट गॅस प्रोसेस कंपनी व संयुक्त अरब अमिरातील ॲडनोक अबुधाबी नॅशनल ऑइल या संयुक्त भागीदारी कंपनीत प्लॅनिंग मॅनेजर पदी निवड झाली आहे. या कंपन्या गॅस उत्खनन व प्रक्रिया (प्रोसेस) उद्योगात आहेत. त्या प्रामुख्याने इटलीसाठी गॅस सप्लाय करीत आहेत. या प्रोजेक्टची किंमत जवळपास एक लाख करोडो इतके आहे. या कंपनीत प्लॅनिंग मॅनेजर पदी निवड झाल्यानंतर नुकतेच ते संयुक्त अरब अमिरातची राजधानी असलेल्या अबुधाबी या शहरातील या कंपनीच्या कार्यालयात रुजू झाले आहेत. अभियंता महेश ढोबळे हे शिक्षणाची फारशी पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असून आपली जिद्द, हुशारी व प्रयत्नातून येथे पर्यंत पोहोचल्याने परिसरातून कौतुक होत आहे.