लोहारा:- तालुक्यातील जेवळी येथील श्री गुरू सिध्देश्वर विरक्त मठात मानव कल्याणासाठी गुरुवार दि.3 एप्रिल ते दि.5 एप्रिल या काळात अतिरुद्र याग, चंडीका होम, सर्व देवता आराधनाचे आयोजन करण्यात आले असून गुरुवारी (दि.3) या कार्यास विधिवत सुरुवात झाली. जेवळी येथे लोकवर्गणीतून बांधण्यात आलेल्या श्री गुरुसिद्धेश्वर विरक्त मठाचे वास्तु पूजन, लोकार्पण व श्री विरभद्रेश्वर मंदिर कळसारोहण कार्यक्रम सोमवारी दि.7 एप्रिल रोजी रंभापुरी महापिठाचे जगद्गुरु डॉ.प्रसन्ना रेणुकावीर सोमेश्वर शिवाचार्य महास्वामीजी व काशी महापिठाचे जगद्गुरु डॉ.मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान या निमित्त श्रीशैलम येथील चिंतलपूर गंडा मठातील नंदेश्वर स्वामी ज्ञानेश्वर स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार (दि.3) ते शनिवार (दि.5) या तीन दिवसात येथील श्री गुरू सिध्देश्वर विरक्त मठात अतिरुद्र याग, चंडीका होम व सर्व देवता आराधनाची पार पडत आहे. गुरुवारी (दि.3) या विधीला विधिवत सुरुवात झाली असून मंत्र उच्चाराने जेवळी परिसर भक्तिमय झाले. यावेळी मठाधीश मनिप्र गंगाधर महास्वामीजी (जेवळी), दिगंबर शिवाचार्य महास्वामीजी (वसमत), विरूपाक्ष शिवाचार्य महास्वामीजी (कपिलधारा), राजेश्वर शिवाचार्य महास्वामीजी (मेहकर), षडाक्षर बसवराजेंद्र महास्वामीजी (आचलेर), गुरुमूर्ती शिवाचार्य महास्वामीजी (पाळा) यांच्यासह महादेव मोघे, मल्लिनाथ डिग्गे, शिवशरण कारभारी, बाळासाहेब कठारे, महादेव सारणे, नागेश उपासे, सुधीर येणेगुरे, संजय तांबडे, सत्तेश्वर कारभारी, गुंडप्पा कारभारी, आदींची उपस्थिती होती.
# मठाधिश मनिप्र गंगाधर महास्वामीजी, जेवळी
पर्यावरण शुद्धीकरण, राष्ट्रासाठी दैवी आशीर्वाद, लोकांना आध्यात्मिक आणि भौतिक लाभ मिळविण्यासाठी येथे अतिरुद्र याग, चंडीका होम व सर्व देवता आराधनाचे आयोजन करण्यात आले आहे.