लोहारा :- श्री कुलस्वामिनी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सह्याद्री अंकुर शिशुगृहात आज एका अत्यंत हृदयस्पर्शी सोहळ्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. संस्थेने येथील अवघ्या चार महिन्यांच्या एका निराधार बालकाला उच्चशिक्षित आणि सुसंस्कृत पालक मिळवून दिले आणि या चिमुकल्याच्या आयुष्यात एक नवीन, प्रेमळ अध्याय सुरू झाला. बाल कल्याण समिती, धाराशिव यांच्या आदेशानुसार, जन्मल्यानंतर केवळ एका तासात निराश्रित अवस्थेत हे बाळ संस्थेच्या देखरेखेखाली आले होते. सह्याद्री अंकुर शिशुगृहाने या बाळाला केवळ आसराच दिला नाही, तर त्याला आईच्या मायेची ऊब आणि उत्कृष्ट संगोपनही दिले. संस्थेतील कर्मचाऱ्यांनी या निष्पाप जीवाचे माता-पित्याप्रमाणे जतन केले. एका सुजाण आणि उच्चशिक्षित जोडप्याने कारा च्या मार्गदर्शन प्रणालीनुसार या बाळाला आपले मानून, त्याला एक सुरक्षित आणि आनंदी भविष्य देण्याचा दृढ संकल्प केला आहे. संस्थेच्या मल्टीपर्पज हॉलमध्ये आयोजित या साध्या पण भावुक दत्तक विधान समारंभात जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. जेव्हा या चिमुकल्याला त्याच्या नवीन पालकांच्या हाती सोपवण्यात आले, तेव्हा उपस्थितांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे आणि आनंदाचे अश्रू तरळले. संस्थेच्या या उदात्त कार्याचे सर्वांनी मनःपूर्वक कौतुक केले. आज एका निराधार बालकाला प्रेमळ पालक आणि सुरक्षित भविष्य लाभले, यापेक्षा अधिक आनंदाची गोष्ट दुसरी कोणती असू शकते? या कार्यक्रमात संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. रमेश दापके यांनी कायदेशीर प्रक्रियेची माहिती दिली. सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ व वंध्यत्व निवारण व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. आदिनाथ राजगुरू यांनी समाजातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था आणि इतर घटकांनी या संस्थेचे पालकत्व स्वीकारण्याचे नम्र आवाहन केले. बालरोगतज्ञ डॉ.दिग्गज दापके-देशमुख यांनी आभार मानले,बील गेट्स ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य सोमनाथ लांडगे यांनी कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन केले. या महत्त्वपूर्ण सोहळ्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभागीय संचालक सतीशजी कोळगे, विभागीय संचालक अजय जानराव,बाल कल्याण समिती अध्यक्ष विजयकुमार माने, बाल संरक्षण अधिकारी विभावरी खुने, संस्थेचे कायदेशीर सल्लागार अँड.दत्तात्रय आवारे, माजी पालकमंत्री यांचे स्वीय सहाय्यक श्रद्धानंद माने – पाटील, डॉ.सचिन रामढवे, धाराशिव जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष चंद्रसेन देशमुख, मुरूड येथील समाज जागृती शिक्षण संस्थेचे संचालक अमोल पटाडे,सह्याद्री कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्राचार्य बाळासाहेब बिराजदार,संस्थेचे सहकारी नानासाहेब घाडगे, दीपक शेळके, फेरोज पल्ला गजानन पाटील, ज्ञानेश्वर गिरी, समन्वयक इश्वर राठोड यांसारख्या अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. या चिमुकल्याच्या जीवनात एका नवीन आशेचा किरण उगवला आहे. सह्याद्री अंकुर शिशुगृहाने दाखवलेल्या ममतेमुळे आणि कर्तव्यनिष्ठेमुळे एका अनाथ बालकाला आई-वडिलांचे प्रेम आणि एक उज्ज्वल भविष्य लाभले आहे, हे निश्चितच प्रेरणादायी आहे.
Home ताज्या बातम्या सह्याद्री’ च्या अंकुरमध्ये फुलले आनंदाचे रोपटे – अनाथ बाळाला मिळाले उच्चशिक्षित पालक