इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील जेवळी येथे मालवाहतूक टेम्पोच्या वायरींगमध्ये शॉर्टसर्कीट होऊन लागलेल्या आगीत टेम्पोसह आतमधील साहित्य जळून खाक झाले. ही घटना शुक्रवारी (दि.९) मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास लोहारा तालुक्यातील जेवळी शिवारात घडली असून प्रसंगावधान राखत टेम्पोतील दोघांनी बाहेर उड्या घेतल्याने त्यांचे प्राण वाचले. धाराशिव तालुक्यातील धारुळ येथील अमृत तुकाराम शिंदे हे टेम्पोमालक आपला माल वाहतूक टेम्पो क्र.एम.एच.२५ ए. जे.६६३६ हा गुजरात राज्यातील वापी येथून केमिकल पावडरची पोती व कागदी खपाटाचे पुट्टे भरून आंध्र प्रदेशातील कडप्पाकडे घेऊन जात होते. हा टेम्पो मालक स्वतः अमृत शिंदे हे चालवत होते तर टेम्पोत आणखी एकजण सोबत होता. हा टेम्पो शुक्रवारी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास लोहारा तालुक्यातील जेवळी येथील भुसप्पा शिवारात आला असता अचानक वायरींगमध्ये शॉर्टसर्कीट होऊन टेम्पोने पेट घेतला. टेम्पोमध्ये केमिकल पावडर व कागदी खपाटीचे पुट्टे असल्याने व जोरदार वारे वहात असल्याने कांही वेळातच संपूर्ण टेम्पो आगीच्या विळख्यात सापडला. यावेळी प्रसंगावधान राखून ट्रक मालक शिंदे व त्यांच्या एका साथीदाराने टेम्पोमधून उडी मारल्याने ते सुदैवाने बचावले. परंतु, संपूर्ण टेम्पोने पेट घेतला. याप्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.