तुळजापूर :– तुळजाभवानी माता छत्रपती शिवरायांना भवानी तलवार देत असतानाचे १०८ उंचीचे भव्य शिल्प तुळजापुरात लवकरच साकारले जाणार आहे. या शिल्पाच्या माध्यमातून ‘शिवभवानी’ शिल्पाचा अंगावर शहारे आणणारा प्रेरणादायी इतिहास सर्व भाविकांना अनुभवता येणार आहे. त्यासाठी राज्याच्या कला संचालनालयाकडे देशभरातील मान्यवर शिल्पकारांकडून शिल्पनमुने मागविण्यात येणार आहेत. हे भव्य शिल्प केवळ एका ऐतिहासिक घटनेचे प्रतीक नसून, शिवछत्रपतींनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या महान प्रारंभाच्या प्रेरणेची जाज्वल्य गाथा असणार आहे. मुंबईच्या निर्मल भवन येथे तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या अनुषंगाने उच्चस्तरीय बैठक झाली. या महत्वपुर्ण बैठकीत ऐतिहासिक आणि आध्यात्मिक दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या बैठकीत आई तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देत असल्याचा १०८ फूट उंच शिल्प उभारण्याच्या प्रस्तावावर झालेल्या सखोल चर्चेबाबत मित्रचे उपाध्यक्ष आ राणाजगजितसिंह पाटील यांनी माध्यमांना सविस्तर माहिती दिली. या भव्य आणि ऐतिहासिक शिल्पाच्या अनुषंगाने सुप्रसिद्ध इतिहासकार पांडुरंग बलकवडे यांनी या प्रसंगाचे ऐतिहासिक संदर्भ, शिलालेख, ग्रंथ व लोकपरंपरेवर आधारित माहिती सादर करण्याचे मान्य केले आहे. या आधारे योग्यतेने सादरीकरण करणाऱ्या शिल्पकारांची निवड केली जाणार आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी या त्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचे निश्चित केले आहे. या शिल्पामुळे भाविकांना केवळ धार्मिक अनुभूतीच नव्हे तर राष्ट्रनिर्माते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपतींचे प्रेरणास्थान असलेल्या आई तुळजाभवानी देवीच्या साक्षात भेटीचा अद्वितीय अनुभव मिळणार आहे. हे शिल्प श्रद्धा आणि परंपरेचे जिवंत प्रतीक असणार आहे. शिल्प स्थापनेनंतर तुळजापूर हे केवळ धार्मिक ठिकाण न राहता, ऐतिहासिक, कलात्मक आणि पर्यटनदृष्ट्या एक नव्या रूपात देशाच्या आणि पर्यायाने जगाच्या सामोरे येईल. यामुळे देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण वाढून स्थानिक पर्यटनालाही मोठी चालना मिळेल. या प्रेरणादायी आणि भव्य शिल्पाभोवती आकर्षक परिसर विकास, प्रकाशयोजना, माहिती दालन, आणि शिल्पकलेचे प्रदर्शन केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्र तुळजापूरच्या सौंदर्यात लक्षणीय वाढ होणार आहे. मंदिर परिसराचा जीर्णोद्धार, स्वच्छता व सोयीसुविधांमुळे भाविक व पर्यटक दोघांनाही एक सुखद अनुभव मिळणार आहे. या शिल्पासाठी कला संचालनालय आणि पुरातत्व विभाग यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. देशभरातील नामवंत शिल्पकारांना शिल्पाचे नमुने सादर करण्याबाबत कला संचालनालयाच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अडीच ते तीन फूट आकाराचे शिल्पनमुने सादर करण्यात येणार आहेत. त्यातून उत्कृष्ट पाच शिल्प नमुन्याची निवड होणार आहे. या पाच सर्वोत्तम शिल्पापैकी सर्वोत्कृष्ट शिल्प निवडल्यानंतर प्रत्यक्ष शिल्प उभारणीस प्रारंभ केला जाईल. या ऐतिहासिक उपक्रमामुळे तुळजापूरचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैभव नव्याने खुलणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आई तुळजाभवानी मातेच्या सेवेसाठी आपल्याला मोठे पाठबळ दिले आहे. शिवभक्तांना आणि भवानीमातेच्या भक्तांना त्यांच्या श्रद्धेचे प्रतीक आणि आपल्या इतिहासाचा प्रेरणादायी भाग असलेला रोमांचकारी क्षण त्यामुळे अनुभवता येणार आहे. हा प्रकल्प केवळ शासनाचा नसून, तो भाविक व जनतेचा देखील आहे. हे श्रींचे कार्य आहे… या ऐतिहासिक शिल्प निर्मितीत जनतेचे योगदान घेण्याचे ठरले आहे. त्यामुळे आपण शक्य त्या स्वरूपात आर्थिक, बौद्धिक वा सेवाभावी कार्यात सहभाग नोंदवावा, शिवभक्तांच्या एकजुटीने आणि भवानीमातेच्या कृपेने हे स्वप्न नक्कीच साकार होईल, असे मित्रचे उपाध्यक्ष आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, अदि उपस्थित होते.