लोहारा येथे जगदंबा मंदिरातील पादुका व कासव चोरी प्रकरणी मुद्देमालासह एकजण ताब्यात

0
227

 

 

लोहारा :–  लोहारा शहरातील जगदंबा देवी मंदीरातील पादुका चोरी व याच मंदिरातील ६ महिन्यांपूर्वी कासव चोरी गेलेल्या प्रकरणातील आरोपीला मुद्देमालासह पकडण्यात लोहारा पोलीसांना यश आले आहे. सोमवारी दि.९ जून रोजी लोहारा तालुक्यातील जेवळी येथून एका संशयितास लोहारा पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहारा शहरातील जगदंबा देवी मदिरासमोरील बाहेर भाविकांनी दर्शन घेण्यासाठी ठेवण्यात आलेल्या पादुकांची अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची घटना गुरुवारी दि.५ जून रोजी घडली होती. ही चोरीची घटना मंदिरात असलेल्या सी.सी.टी.व्ही.कॅमेऱ्यात कैद झाली होती. याप्रकरणी शुभम गोसावी (रा.लोहारा) यांनी लोहारा पोलीस ठाण्यात पादुका चोरी करणाऱ्या अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार अर्ज देऊन कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार लोहारा पोलिसांनी चोरी करणाऱ्याचे फुटेज कॅमेऱ्यात कैद झाल्याने. या फुटेजची सखोल पाहणी व चौकशी सुरु केली होती. उपविभागीय पोलिस अधिकारी उमरगा सदाशिव शेलार, पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी निरंजन माळी यांनी पोलीस अंमलदार भोजने यांच्या मदतीने तपास सुरू केला होता. दरम्यान जेवळी (ता.लोहारा) येथे एक संशयीत व्यक्ती फिरत असल्याची माहीती लोहारा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार तपासी अधिकारी निरंजन फुलमाळी यांनी आरोपी मनोहर बाबुराव इंगळे (रा.बलसुर, ता.उमरगा) याला ताब्यात घेऊन त्यास विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता इंगळे याने जगदंबा देवी मंदिरातील पादुका चोरी केल्याची कबुल केले. संबंधीत आरोपीला विचारणा केली असता उजणी (ता.औसा,जि. लातूर) येथील भंगार वाल्याला चोरी केलेली पादुका विकल्याचे सांगितले. त्यानंतर लोहारा पोलिसांच्या पथकाने उजनी (ता.औसा) येथून विक्री केलेल्या भंगार वाल्या दुकानातून देवीच्या पादुका अंदाजे किंमत ३ हजार रुपये, व याच मंदिरातून ६ महीन्यापुर्वी १५०० रुपये किंमतीचे चोरीला गेलेले कासव हे दोन्ही मुद्देमाल ताब्यात घेतले. याप्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात संबंधित चोरत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here