मुरूम :– येथील नगरपरिषद चे मुख्याधिकारी सचिन भुजबळ यांनी नगरपरिषद हद्दीतील शहर वासीयांना नगरपरिषद कडून राबविण्यात येत असलेल्या वृक्ष लागवड मोहीम अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या संकल्पनेतुन जिल्हाभरात “हरित धाराशिव” अभियानांतर्गत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.मुरूम पालिकेच्या वतीने दि 19 जुलै रोजी जलशुद्धीकरण केंद्र तसेच पालिका हद्दीत 9 हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.पर्यावरणाच्या संवर्धनासाठी सुरू करण्यात आलेल्या या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन मुख्याधिकारी सचिन भुजबळ यांनी केले आहे.
शहरालगत असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रातील मोकळ्या जागेत नगरपालिकेच्या पुढाकाराने वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.सध्या वृक्ष लागवडीसाठी जमिनीत खड्डे घेण्याचे काम वेगाने काम सुरू आहे.याठिकाणी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी विविध प्रकारच्या झाडांची तसेच औषधी वनस्पती व फळझाडांची लागवड करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी सचिन भुजबळ यांनी दिली आहे.दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे.लहान मोठ्या कारखान्याच्या माध्यमातुन प्रदूषण वाढत आहे.परिणामी तापमानात वाढ होण्याबरोबरच पावसाचे प्रमाण देखील कमी होत चालल्याने शेती व्यवसाय संकटात येत आहे.जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांची “हरित धाराशिव” संकल्पना अतिशय चांगली आहे.भविष्यात पर्यावरणाचा ऱ्हास थांबवून समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड मोहीम फायदेशीर ठरणार आहे.या अभियानांतर्गत जिल्हाभरात 50 लाख वृक्षांची लागवड करण्यात येणार असली तरी लावलेल्या झाडांचे संवर्धन होणे गरजेचे आहे.


