लोहारा :- शहरातील आंबेडकर चौकातील श्री जयलक्ष्मी ज्वेलर्स हे दुकान फोडुन चोरट्यांनी 40 हजार रुपये रोकडसह नवीन 5 किलो चांदी व 3 किलो चांदीची मोड, असा 7 लाख 81 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली होती. याप्रकरणी गुन्हा नोंद झाल्यानंतर लोहारा पोलिसांनी अवघ्या दोन दिवसात यातील एका चोरट्यास गुरुवारी पहाटे पुणे जिल्ह्यातील वारजे पोलिस ठाणे हद्दीतील माळेगाव येथे जाऊन पकडले. शहरातील अविनाश माळी यांचे डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातील श्री जयलक्ष्मी माऊली ज्वेलर्स हे सोने चांदीचे दुकान मंगळवारी पहाटे 4 वाजायच्या सुमारास फोडुन चोरट्यांनी दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे वायर काढुन हार्ड डिस्क काढण्यासाठी बॉक्सला छेडछाड केली होती. तसेच सोकेश व काउंटरमध्ये ठेवलेले चांदीचे तयार व मोडीसाठी आलेले जुने दागिने, रोख रक्कम 40 हजार रुपये, असे एकुण 8 किलो चांदिचे दागिने व रोख 40 हजार रुपये घेऊन पोबारा केला. या प्रकरणी अविनाश फुलसुंदर यांच्या फिर्यादीवरून लोहारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चोरीच्या तपासकामी तीन पथकांची निर्मिती मंगळवारी सकाळीच करण्यात आली होती. त्यानंतर मंगळवारी रात्री खबर्याकडुन पोलीसांना चोरट्याचा माग लागतात तीन्ही पथके एकत्र करण्यात आली. यानंतर पोलिसांनी पाटण जिल्हा सातारा, चिपळूण जिल्हा रत्नागिरी, सांगोला, माळशिरस जिल्हा सोलापूर येथे शोध घेतला. यादरम्यान सांगोल्यातून MH 45, ए 8458 या क्रमांकाची चारचाकी गाडी चोरी गेल्याचे समजले. दरम्यान लोहार्यातही चोरी करताना चोरट्यांनी अशीच चारचाकी गाडी वापरल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्ट झाले होते. त्यामुळे हेच चोरटे असल्याची खात्री पोलिसांना झाली. हे चोरी केलेल्या गाडीसह पुण्याच्या दिशेने दरोडा टाकण्यासाठी गेल्याची खबर पोलीसांना लागताच तेही चोरट्याच्या मागावर पुण्याच्या दिशेने रवाना झाले. तेथे पुणे जिल्ह्यातील वारजे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील माळेगाव येथे एका घरावर दरोडा टाकत असताना लोहारा पोलीसांनी सोनुसिंग कपुरसिंग टाक रा.गायकवाड पाडा, जिल्हा पालघर या आरोपीस चारचाकी गाडीसह ताब्यात घेतले असुन, अन्य चार आरोपी पळुन जाण्यात यशस्वी झाले. या गाडीमध्ये लोहार्यातील चोरी केलेली चांदीही पोलीसांना सापडली.
______________________________________
लोहारा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
सदर चोरी हि पहाटे 3: 41 ते पहाटे 4 :10 मिनीटांदरम्यान झाली असल्याचे दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजवरुन स्पष्ट झाले. जिल्ह्यातुन तात्काळ फिंगर प्रिंट एक्स्पर्ट दाखल झाले. पण चोरट्यांनी हातात ग्लोज घातल्यामुळे चोरट्यांचे ठसे सापडले नाहीत. त्यातच स्कॉड पथकालाही पाचारण करण्यात आले होते, पण या चोरट्यांनी चोरी केल्यानंतर सेंन्ट मारल्यामुळे श्वनालाही कुठला वास दाखवता आला नव्हता. त्यामुळे या दोन्ही पथकांच्या हाती कांहीच लागले नाही. तरीही पोलीसांनी तपासाचे चक्री फिरवत चोरीचा तपास लावल्याने पोलीसांचे कौतुक करण्यात येत आहे.
_______________________________________
जेलमध्ये ठरले होते सारे नियोजन
हे चोरटे सराईत गुन्हेगार असुन एकाच ठिकाणचे नाहीत. या आरोपींची जेलमध्ये असताना एकमेकांशी ओळख झाली आणि त्यांनी चोरी करण्याचे नियोजन जेलमध्येच केले होते. त्यांनी राज्यात अनेक ठिकाणी चोर्या केल्याचे सुत्रांकडून समजते. त्यामुळे या चोरट्यांकडुन राज्यातुन अनेक चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा होणार असल्याचे पोलीसांचे म्हणने आहे.
यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आकाश भोसले, अर्जुन तिगाडे, निरंजन माळी व गृहरक्षक बिलाल गवंडी यांनी केली


