कारगिल विजय दिन बलिदान आणि समर्पणाची भावना निर्माण करणारा दिवस– प्राचार्य संजय अस्वले 

0
110

 

धाराशिव :–  ‘कारगिलच्या लढाईत आपल्या सैन्य दलाने अत्यंत विपरीत परिस्थितीत विजय मिळविला.हे युद्ध जगातील अप्रतिम मानले जाते.देशाकरीता सर्वकाही हे भावना रुजवणारे हे युद्ध आहे.आज देशाला युवा नेतृत्वाची गरज असून कारगिल विजय दिन युवा पिढीत त्याग,बलिदान आणि समर्पणाची भावना निर्माण करणारे दिवस आहे,असे प्रतिपादन श्री. छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय अस्वले यांनी केले.माहिती व प्रसारण मंत्रालय भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय, सोलापूर, श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, 53 महाराष्ट्र बटालियन एनसीसी आणि भारतीय माजी सैनिक संघटना उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने उमरगा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय येथे आयोजित कारगिल विजय दिवस समारंभात अध्यक्षस्थानावरून प्राचार्य श्री. अस्वले बोलत होते.यावेळी केंद्रीय संचार ब्युरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादव,भारतीय माजी सैनिक संघटना अध्यक्ष शहाजी चालुक्य,महा एनजीओ फेडरेशनचे संचालक अमोल उंबरजे,सेवानिवृत्त ऑर्डीनरी कॅप्टन दत्तात्रय जगताप सेवानिवृत्त हवालदार खंडू दूधभाते उपप्राचार्य डॉ विलास इंगळे,डॉ पद्माकर पिटले आणि कॅप्टन डी एस चिटमपल्ले यांची प्रमुख उपस्थिती होती.कारगिल विजय दिवस निमित्त महाविद्यालय परिसरात माजी सैनिक संघटनेतर्फे उभारण्यात आलेल्या अमर जवान स्मृती स्तंभास एनसीसी छात्र सैनिकांनी रायफल सलामी देऊन मानवंदना दिली.याप्रसंगी मान्यवरांनी शहीद स्मृतीस पुष्प चक्र अर्पण केले. अमोल उंबरजे यांनी आपल्या शहीद वीरांच्या आयुष्यातून प्रेरणा घेऊन भावी पिढीने सैन्य दलात प्रवेश करून देश सेवा करावी असे आवाहन केले.यावेळी माजी सैनिक दत्तात्रय जगताप,खंडू दूधभाते आणि शहाजी चालुक्य यांनी कारगिल युद्धातील प्रसंगावर भाषण देऊन वीर गाथा सादर केली.यावेळी माजी सैनिक,वीरमाता व वीर पत्नी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित निबंध आणि रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना स्मृती चिन्ह, बक्षीस व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक अंबादास यादव यांनी केले.संचालन डॉ पी डी पाटील यांनी केले,आभार डॉ डी एस चिटमपल्ले यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्रीय संचार ब्युरोचे कार्यालय सहाय्यक जे एम हन्नुरे व छात्र सैनिकांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here