मुरुम : – ऑक्टोबर २०२४ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे उमरगा व लोहारा तालुक्यांतील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असताना मुरुम महसूल मंडळाचा अतिवृष्टी अनुदान योजनेतून वगळण्यात आल्याने संतप्त शेतकऱ्यांनी गुरुवारी दि. ७ ऑगस्ट रोजी तीव्र आंदोलन करत . मुरुम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन करत शासनाच्या अन्यायकारक निर्णयाचा तीव्र निषेध नोंदवला.

शेतकऱ्यांचा आरोप आहे की, शासनाच्या पंचनाम्यानुसार मुरुम महसूल मंडळात ३३ टक्क्यांपेक्षा अधिक शेतीचे नुकसान झाले असतानाही योजनेतून वगळल्यामुळे शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. या अगोदरही अशाच प्रकारे अन्याय झाला असून, मागील वेळी देखील आंदोलनानंतरच मुरुम महसूल मंडळाचा समावेश करण्यात आला होता.याच पार्श्वभूमीवर सायंकाळी मुरुमजवळील विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शेतकरी मेळाव्याच्या आधीच असंख्य शेतकरी रस्त्यावर उतरले. त्यांनी रोष व्यक्त करत प्रशासनाबाबत आपली नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या वतीने महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले की, मध्यवर्ती असूनही मुरुम महसूल मंडळाला सातत्याने योजनांमधून वगळण्यात येतो. यामुळे शासनाची भूमिका शंकास्पद वाटत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या आंदोलनात पत्रकार मोहन जाधव, सामाजिक कार्यकर्ते लखन भोंडवे, अजित चौधरी, प्रा. दत्ता इंगळे यांनी तीव्र रोष व्यक्त करत विचारले की, “मुरुमच्या चारही बाजूंचे महसूल मंडळ अतिवृष्टी अनुदान योजनेत असूनही मुरुमला डावलले जाणे, हा अन्याय नव्हे तर कटकारस्थान आहे.” या आंदोलनात बाबा कुरेशी, राहुल वाघ, चंद्रशेखर मुदकन्ना, राजेंद्र शिंदे, संजय सावंत, श्रीधर इंगळे, गणेश कडगंचे, गोविंद सोबाजी, राजेंद्र बेंडकाळे, विशाल व्हनाळे, बाळासाहेब खंडागळे, संजय बेंडकाळे, आनंद भुसाळे, राजू इंगळे, हनुमंत वागदरे, बब्रुवान जाधव, प्रवीण फुगटे, मेहबूब गवंडी, प्रल्हाद माने, विशाल मोहिते, राहुल सत्रे, किशोर शिंदे, गौस मुल्ला, नंदकुमार शिंदे, भालचंद्र बेंडकाळे, संतोष मुदकन्ना, बाळासाहेब गिरिबा यांच्यासह विविध राजकीय व सामाजिक संघटनांचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. शेतकऱ्यांनी इशारा दिला आहे की, जर मुरुम महसूल मंडळाचा तात्काळ अतिवृष्टी अनुदान योजनेत समावेश करण्यात आला नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.


