भूमी अभिलेख कार्यालयांची दयनीय स्थिती;  तातडीने संरचनात्मक सुधारणा व स्वतंत्र अधिकारी ची मागणी 

0
235

 

उमरगा :  – धाराशिव जिल्ह्यातील भूमी अभिलेख आणि उप-अभिलेख कार्यालयांची अत्यंत जीर्ण अवस्थेमुळे शेतकरी, नागरिक आणि कर्मचाऱ्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत असल्याने ऍड. शीतल चव्हाण फाउंडेशन, उमरगा तर्फे महसूलमंत्री  चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन देण्यात आले आहे. हे निवेदन उपविभागीय अधिकारी, धाराशिव यांच्या मार्फत पाठवण्यात आले असून, संरचनात्मक पाहणी (Structural Audit), तातडीची दुरुस्ती, आधुनिक संगणकीकृत इमारतींची उभारणी तसेच 7/12 उताऱ्यांतील तफावत दूर करण्यासाठी स्वतंत्र अधिकारी नेमण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, भूमी अभिलेख कार्यालयांमध्ये जतन केलेली ७/१२, फेरफार, नकाशे, मालमत्ता नोंदी, रजिस्टर यांसारखी भविष्यकालीन संदर्भात अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे पावसाळ्यात गळतीमुळे ओलसर होऊन नासधूस होत आहेत. काही ठिकाणी छपरांची गळती इतकी गंभीर आहे की, कार्यालयीन फर्निचर आणि संगणकीय साहित्य सुद्धा धोक्यात आले आहे.
जुनी, जीर्ण आणि असुरक्षित झालेल्या इमारतींमुळे कर्मचाऱ्यांसह नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे. ही परिस्थिती शासनाच्या प्रतिष्ठेला बाधक असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
ग्रामीण भागात ई-फेरफार, डिजिटायझेशन आणि ऑनलाईन सेवा सुरळीतपणे सुरू ठेवण्यासाठी योग्य पायाभूत सुविधा नसल्याची समस्या उपस्थित केली आहे. तसेच तहसील कार्यालय व भूमी अभिलेख कार्यालयातील क्षेत्र नोंदीतील तफावत, ई-पिक पाहणीतील विसंगती, सर्व्हे क्षेत्राची अचूक नोंद, तसेच 7/12 उताऱ्यावर आधार लिंक, मोबाईल व बँक खात्याची नोंद यासारख्या कामांसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
फाउंडेशनच्या वतीने पुढील मागण्या करण्यात आल्या अनेक;

1. धाराशिव जिल्ह्यातील सर्व महसूल व भूमी अभिलेख कार्यालयांची तातडीने संरचनात्मक पाहणी (Structural Audit) करणे.

2. गळती, ओलावा, असुरक्षित भिंती-छत यांची तातडीने दुरुस्ती करून आवश्यक निधी उपलब्ध करून देणे.

3. दीर्घकालीन उपाययोजनेत आधुनिक, संगणकीकृत व सुरक्षित इमारतींची उभारणी.

4. कागदपत्रांचे स्कॅनिंग, डिजिटायझेशन आणि सुरक्षित संग्रहणासाठी स्वतंत्र कक्ष व उपकरणे उपलब्ध करून देणे.

5. 7/12 उताऱ्यांतील तफावत दूर करण्यासाठी आणि ई-पिक पाहणीतील अडचणी सोडवण्यासाठी स्वतंत्र अधिकारी नेमणे. आदी मागण्या करण्यात आल्या असून, निवेदनवर सत्यनारायण जाधव, व्यंकट उर्फ राजू भालेराव, किशोर औरादे, करीम शेख, ऍड. अर्चना जाधव, प्रदीप चौधरी, ज्योती माने, धानय्या स्वामी, शबाना उडचणे, राजू बटगिरे, प्रदीप मोरे, किशोर बसगुंडे, संतोष चव्हाण, ऍड. ख्वाजा शेख, कविता साळी आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here