शेतकऱ्यांना सरसकट व तात्काळ नुकसान भरपाई द्यावी — ऍड. शीतल चव्हाण फाउंडेशनची मागणी 

0
135

उमरगा (प्रतिनिधी): धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या सततच्या अतीवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर उपजीविकेचे संकट कोसळले आहे. या पार्श्वभूमीवर दि.21 (गुरुवार) रोजी ऍड. शीतल चव्हाण फाउंडेशन, उमरगा यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी, उमरगा यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात सांगण्यात आले की, पंचनामे, अहवाल व शासनस्तरीय प्रस्ताव या औपचारिक प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना मदत मिळण्यात मोठा विलंब होतो. सध्या शेतकऱ्यांच्या हातचे पीक गेले असून कर्जबाजारीपणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. म्हणून शासनाने औपचारिक प्रक्रिया टाळून शेतकऱ्यांना सरसकट व तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.निवेदनात धाराशिव जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट व तातडीची नुकसानभरपाई द्यावी, नुकसानभरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी, शेतकऱ्यांच्या चालू हंगामातील कर्ज परतफेडीसाठी कर्जमाफी किंवा स्थगिती जाहीर करावी, पीक पुनर्लागवड व उपजीविकेसाठी तातडीच्या मदतीसाठी विशेष पॅकेज जाहीर करण्यात यावे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.या निवेदनावर सत्यनारायण जाधव, व्यंकट उर्फ राजू भालेराव, किशोर औरादे, करीम शेख, ऍड. अर्चना जाधव, प्रदीप चौधरी, ज्योती माने, धानय्या स्वामी, शबाना उडचणे, राजू बटगिरे, प्रदीप मोरे, किशोर बसगुंडे, संतोष चव्हाण, ऍड. ख्वाजा शेख, कविता साळी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here