उमरगा : शहरात गौरी-महालक्ष्मी उत्सव मोठ्या श्रद्धा, भक्ती आणि उत्साहात साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील वेदपाठक कुटुंबियांच्या घरी यंदा विशेष आकर्षण ठरले आहे ते म्हणजे १२ ज्योतिर्लिंगांचा देखावा. हा देखावा पाहण्यासाठी महिलांसह भाविकांची मोठी गर्दी उसळली असून, प्रत्येकाने या अद्वितीय कलाकृतीचे कौतुक केले.

गौरी-महालक्ष्मी उत्सवात दरवर्षी विविध प्रकारचे धार्मिक देखावे साकारले जातात. मात्र, या वर्षी वेदपाठक कुटुंबाने विशेष परिश्रम घेऊन १२ ज्योतिर्लिंगांची अप्रतिम प्रतिकृती तयार केली आहे. भाविकांना एकाच छताखाली भारतातील पवित्र १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेण्याची संधी मिळाल्याने सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.हा देखावा साकारण्यासाठी सौ. निता वेदपाठक, त्यांची सून सौ. सागरिका वेदपाठक, नागेश वेदपाठक, धनंजय वेदपाठक आणि रवी पोतदार यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या या कलात्मक व धार्मिक उपक्रमामुळे महालक्ष्मीच्या आगमनाचा क्षण अधिक मंगलमय आणि भावस्पर्शी झाला आहे.१२ ज्योतिर्लिंगांचा हा देखावा केवळ आकर्षण ठरत नसून श्रद्धाळूंसाठी एक आध्यात्मिक व प्रेरणादायी अनुभव ठरत आहे. महिलांनी मोठ्या उत्साहाने या देखाव्याचे दर्शन घेतले असून, भक्तिभावाने महालक्ष्मीला प्रार्थना अर्पण केल्या.उमरगा शहरात सुरू असलेल्या गौरी-महालक्ष्मी उत्सवाला पारंपरिक रितीरिवाज, कलात्मक सजावट आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचीही जोड मिळत आहे. त्यात वेदपाठक कुटुंबाचा १२ ज्योतिर्लिंगांचा देखावा हा नक्कीच या उत्सवाचा केंद्रबिंदू ठरला आहे.


