उमरगा :– येथील प्रा. शामराव रघुनाथराव चव्हाण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मुळज येथे सन २०१८ साली स्थापन करण्यात आलेल्या वाचनालयाच्या माध्यमातून शिक्षण व वाचनसंस्कृतीला चालना देणारे अनेक उपक्रम राबवण्यात येतात. उमरगा – लोहारा परिसरातील वाचनालयांच्या 13 शाखा, “पान टपरी नव्हे, ज्ञान टपरी” या ब्रीदाखाली सुरू झालेली ‘वाचन टपरी’, हेअर सलून व टी-स्टालवरील वाचन कट्ट्यांनी उमरगा आणि लोहारा परिसरात वाचनाची नवी चळवळ निर्माण केली आहे. मकरसंक्रांतीला पुस्तकांचे वाण लुटणे, गुढी पाडव्याला पुस्तक गुढ्या उभारणे, पुस्तक पालख्या व ग्रंथ दिंडी काढणे, गणेशोत्सवात पुस्तक वाचणाऱ्या गणपतीची प्रतिष्ठापना करणे, दसऱ्याला विवेकयात्रा काढणे अशा विविध उपक्रमांद्वारे वाचन संस्कृतीचा प्रसार सातत्याने सुरू आहे.या वाचनालयाच्या वतीने सन २०१९ पासून दरवर्षी “प्रा. शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती गौरव पुरस्कार” प्रदान करून विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात येतो. प्रा. चव्हाण यांच्या स्मृतीदिनी म्हणजेच ६ सप्टेंबर रोजी पुरस्कारांची घोषणा करण्यात येते, तर डिसेंबर महिन्यात पुरस्कार वितरण समारंभ आयोजित केला जातो.यंदा दि. ६ सप्टेंबर (शनिवार) रोजी प्रा. चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करून पुरस्कार जाहीर करण्यात आले. यावर्षी जीवन गौरव पुरस्कारासाठी डॉ. दामोदर पतंगे, गुंजोटी, समाजरत्न पुरस्कार – डॉ. दीपक पॉफळे, उमरगा, कृषीरत्न पुरस्कार – अनिल जगताप, भातागळी (ता. लोहारा), उद्योगरत्न पुरस्कार – सतीश बाबूराव पवार, नाईचाकूर, शिक्षकरत्न पुरस्कार – रामजी सोळुंके, माडज, सहकाररत्न पुरस्कार – वसंतराव नागदे, ग्रंथसेवा पुरस्कार – सौ. भाग्यश्री औरादे, कदेर, संगीतरत्न पुरस्कार – गौरी कांबळे, कसगी, उत्कृष्ट वाचक पुरस्कार – महादेव शिंदे, तुगाव, पत्रकाररत्न पुरस्कार –. बालाजी बिराजदार, लोहारा तर कला रत्न पुरस्कार – विशाल कानेकर, तुरोरी यांना जाहिर करण्यात आले.या प्रसंगी वाचनालयाचे संस्थापक ऍड. शीतल चव्हाण यांनी पुरस्कारांची घोषणा करत प्रा. चव्हाण यांच्या कार्याचा गौरव केला व पुढील पिढीला वाचनसंस्कृतीशी जोडण्याचा संकल्प व्यक्त केला.कार्यक्रमास शांताबाई चव्हाण, अनुराधा पाटील, सत्यनारायण जाधव, व्यंकट भालेराव, किशोर औरादे, करीम शेख, धानय्या स्वामी, प्रदीप मोरे, राजू बटगिरे, ऍड. ख्वाजा शेख, प्रदीप चौधरी, ऍड. अर्चना जाधव, शबाना उडचणे, संतोष चव्हाण, ज्योती माने, किशोर बसगुंडे, बबिता मदने आदी मान्यवर उपस्थित होते.


