उमरगा : प्रा. शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती वाचनालय व ऍड. शीतल चव्हाण फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी दसरा तथा विजयादशमीनिमित्त काढण्यात येणारी विवेकयात्रा यंदाही उमरगा शहरातून हुतात्मा स्मारक ते छ. शिवाजी महाविद्यालय या मार्गावर काढण्यात आली. यावेळी ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विवेक यात्रेच्या माध्यमातून बाधित लोकांसाठी वस्तू, पदार्थ, कपडे व रोख स्वरूपात मदतीचे संकलन करण्यात आले.”विवेकयात्रेच्या माध्यमातून पुस्तके अन् लेखण्या हीच आधुनिक काळातील आमची खरी शस्त्रास्त्रे आहेत असे सांगत विचारांचा जागर करणारी, अज्ञानाच्या सीमा ओलाडून ज्ञानाच्या जगात पाय ठेवायला सांगणारी, विचारांचं सोने लुटणारी अन् विवेकाचा जागर करणारी ही विवेकयात्रा आहे. यंदा अतिवृष्टी व ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर या यात्रेच्या माध्यमातून जवळपास दोन लाख रुपये किमतीच्या वस्तू, पदार्थ, कपडे व रोख मदतीचे संकलन करण्यात आले असून गरजू कुटुंबांना ही मदत दसऱ्याला संध्याकाळी आपट्याच्या पानांऐवजी वाटली जाणार असल्याची माहिती विवेक यात्रेचे संकल्पक ऍड. शीतल चव्हाण यांनी दिली.दरम्यान राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला आमदार प्रवीण स्वामी, त्यांच्या मातोश्री प्रभावती स्वामी व ऍड. शीतल चव्हाण फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व विवेक यात्रेला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर ढोल-ताशा पथक, हलगी पथक, भजनी मंडळ यांचे सादरीकरण करत विद्यार्थी, महिला व पुरुष यांनी महामानवांच्या विचारांचे फलक, पुस्तके व लेखण्या हातात घेऊन विवेकयात्रा पुढे नेली. विवेक यात्रेच्या माध्यमातून मा. शाहुराज कदेरे यांनी रु.17,000/- किमतीच्या 100 साड्या, माजी नगराध्यक्ष मा. रजाक अत्तार यांनी अतिवृष्टीग्रस्तांसाठी ब्लॅंकेट्स, मा. शरण स्वामी यांनी रु.15,000/- चा धनादेश, जिजाऊ ब्रिगेडने 100 साड्या, डॉ. विजयकुमार शिंदे – तुरोरी यांनी साड्या, कपडे, ब्लॅंकेट्स, बेडशीट्स, मा. सुरेशदाजी बिराजदार व मा. कमलाकर मुळे – मुळज यांनी पुस्तके, ऍड. प्रवीण तोतला व मा. दत्तात्रय सरपे यांच्या वतीने कपडे, तसेंच ऍड. शीतल चव्हाण फाउंडेशनच्या वतीने साड्या, ऊबदार कपडे, कोरडा शिदा, औषधे तसेच रोख रक्कम रु.15,000/- असे एकत्रित मिळून रु.2,00,000/- च्या मदतीचे संकलन करण्यात आले. यात्रेत शांताबाई चव्हाण, ॲड. शीतल चव्हाण, सत्यनारायण जाधव, राजू भालेराव, राजु बटगिरे, ॲड.ख्वाजा शेख, किशोर बसगुंडे, विजय चितली, भावना नान्नजकर, धम्मचारी प्रज्ञाजित, रेखाताई पवार, अनुराधा पाटील, ऍड. अर्चना जाधव, एस. के. चेले, निर्मला देशमुख, प्रिती जाधव, संतोष चव्हाण, संजय कांबळे, हरीश डावरे, ज्योती माने, शबाना उडचणे, बबिता मदने, धीरज बेळंबकर, दत्तात्रय जाधव, दिलीप गरुड, साक्षी चव्हाण, बहुजन हिताय वसतिगृहाचे विद्यार्थी, डॉ. के. डी. शेंडगे शाळेचे विद्यार्थी, नाथ क्लासेसचे विद्यार्थी आदींची उपस्थिती होती.


