उमरगा :– ऍड. शीतल चव्हाण फाउंडेशनच्या वतीने भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माननीय सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांच्यावर झालेल्या अमानुष हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला. या संदर्भात फाउंडेशनतर्फे दि.7 रोजी उमरगा चे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, दिनांक 06 ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात एका वकीलाने सरन्यायाधीश भूषण गवई साहेबांवर बूट फेकून लोकशाहीविरोधी, अशोभनीय आणि जातीय प्रेरित कृत्य केले. हे कृत्य केवळ एका व्यक्तीवर नव्हे, तर संपूर्ण भारतीय न्यायसंस्था आणि संविधानिक मूल्यांवर झालेला गंभीर आघात असल्याचे फाउंडेशनने म्हटले आहे.निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, संबंधित आरोपी स्वतःला “सनातनी व मनुवादी विचारसरणीचा अनुयायी” म्हणवतो, आणि त्याच्या घोषणेतून जातीय व वर्चस्ववादी प्रवृत्ती स्पष्ट दिसते. मा. न्यायमूर्ती भूषण गवई हे दलित समाजातील असंख्य लोकांसाठी प्रेरणास्थान असून न्यायसंस्थेतील सर्वोच्च पदावर पोहोचलेल्या व्यक्ती आहेत. त्यांच्या विरोधात केलेले हे कृत्य सामाजिक समतेच्या आणि न्यायाच्या मूलभूत तत्त्वांच्या विरोधात जाणारे आहे.फाउंडेशनने या घटनेचा निषेध नोंदविताना संबंधित आरोपीवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करण्यात तसेच, अशा प्रकारच्या जातीय व असंविधानिक विचारांना पाठिंबा देणाऱ्या घटकांचाही सखोल तपास करून त्यांच्यावर योग्य शासन करण्यात यावे तसेच न्यायसंस्थेचा सन्मान अबाधित ठेवण्यासाठी आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून शासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अशा मागण्या शासनाकडे केल्या आहेत.या प्रसंगी ऍड. शीतल चव्हाण फाउंडेशनच्या प्रतिनिधी मंडळात सामाजिक कार्यकर्ते, वाचनालय चळवळीतील कार्यकर्ते आणि फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.फाउंडेशनने स्पष्टपणे म्हटले आहे की, “हा हल्ला केवळ एका व्यक्तीवर नव्हे, तर भारतीय संविधानाच्या आत्म्यावर आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांवर आहे.”निवेदनावर सत्यनारायण जाधव, हरिश डावरे, ऍड. अमोल सूर्यवंशी, दिलीप सुरवसे, संजय कांबळे, व्यंकट उर्फ राजू भालेराव, किशोर औरादे, करीम शेख, ऍड. अर्चना जाधव, प्रदीप चौधरी, ज्योती माने, धानय्या स्वामी, शबाना उडचणे, राजू बटगिरे, प्रदीप मोरे, किशोर बसगुंडे, संतोष चव्हाण, ऍड. ख्वाजा शेख, कविता साळी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Home ताज्या बातम्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी ऍड. शीतल चव्हाण फाउंडेशनच्यवतीने निषेध; आरोपीस कठोर...


